न्यूझीलंड महिलांचा सलग दुसरा पराभव
आयसीसी महिला विश्वचषक : द.आफ्रिकन महिलांचा 6 विकेट्सनी विजय, ब्रिट्सचे शतक
वृत्तसंस्था/ इंदोर
आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने विजयाचे खात उघडले आहे. दक्षिण आफ्रिकेने आपल्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडवर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 232 धावांचे आव्हान दिले होते. आफ्रिकेने हे आव्हान 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. न्यूझीलंडचा हा सलग दुसरा पराभव ठरला. 89 चेंडूत 101 धावांची खेळी साकारणाऱ्या आफ्रिकेच्या तझमिन ब्रिट्सला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या 232 धावांचा पाठलाग करताना तझमीन ब्रिट्सने दक्षिण आफ्रिकेच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. तझमीनने 89 चेंडूत 1 षटकार आणि 15 चौकारांच्या मदतीने 101 धावा केल्या. याशिवाय, सुने लुसने 114 चेंडूत नाबाद 83 धावांचे योगदान दिले. लुसनेने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 1 षटकार लगावला. तर सिनालोने नाबाद 6 धावांचं योगदान दिले. याशिवाय, लॉरा वुलवार्ट आणि मॅरिझन कॅप या दोघींनी प्रत्येकी 14-14 धावांचे योगदान दिले. आफ्रिकन संघाने विजयी टार्गेट 40.5 षटकांतच पूर्ण करत शानदार विजय मिळवला.
प्रारंभी, नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडची सुरुवातच खराब झाली. सलामीवीर सुझी बेट्सला भोपळाही फोडता आला नाही. यानंतर स्टार फलंदाज जॉर्जिया प्लिमरने 31 तर अमेलिया केरने 23 धावांचे योगदान दिले. या दोघीही फारसा चमत्कार दाखवू शकल्या नाहीत. दुसरीकडे, सोफी डिव्हाईनने सर्वाधिक धावा केल्या. सोफीने 98 बॉलमध्ये 9 चौकारासह 85 धावा फटकावल्या. ब्रुक हॅलिडेनें 45 धावांचे योगदान दिले. इतर किवीज महिला फलंदाजांनी मात्र निराशा केल्यामुळे त्यांचा डाव 47.5 षटकांत 231 धावांत आटोपला. दक्षिण आफ्रिकेसाठी नॉनकुलुलेको म्लाबा हीने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या.
दरम्यान, न्यूझीलंडचा हा स्पर्धेतील सलग दुसरा पराभव ठरला. सलग दोन पराभवामुळे उपांत्य फेरी गाठण्याच्या त्यांच्या आशेला धक्का बसला आहे.
संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड 47.5 षटकांत सर्वबाद 231 (सोफी डिव्हाईन 85, हॅलिडे 45, जॉर्जिया 31, म्लाबा 4 बळी)
दक्षिण आफ्रिका 40.5 षटकांत 4 बाद 234 (तझमिन 101, सुने नाबाद 83, अमेलिया केर 2 बळी, जेस केर आणि ताहुहू प्रत्येकी 1 बळी).