For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विजयासह न्यूझीलंड महिलांची मालिकेत बरोबरी

06:22 AM May 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
विजयासह न्यूझीलंड महिलांची मालिकेत बरोबरी
Advertisement

वृत्तसंस्था, कँटरबरी

Advertisement

तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील येथे खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात सामनावीर सोफी डिव्हाईनच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर तसेच मॅडी ग्रीनच्या नाबाद अर्धशतकाच्या आधारे न्यूझीलंड महिला संघाने यजमान इंग्लंडचा 14 धावांनी पराभव करत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने जिंकला होता.

या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने 20 षटकात 5 बाद 170 धावा जमविल्या. त्यानंतर इंग्लंडने 20 षटकात 6 बाद 156 धावांपर्यंत मजल मारली.

Advertisement

न्यूझीलंडच्या डावामध्ये केवळ दोन फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. सोफी डिव्हाईनने 57 चेंडूत 6 षटकार आणि 5 चौकारांसह 87 तर मॅडी ग्रीनने 48 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 56 धावा झळकाविल्या. ग्रीन आणि डिव्हाईन यांनी पाचव्या गड्यासाठी 159 धावांची भागिदारी केली. तत्पूर्वी न्यूझीलंडची स्थिती 3.4 षटकात 4 बाद 11 अशी केविलवाणी झाली होती. प्लिमेर आणि कर्णधार मेली केर यांना खाते उघडता आले नाही. गेझने 4 तर हॅलिडेने 3 धावा जमविल्या. न्यूझीलंडला 20 अवांतर धावा मिळाल्या. न्यूझीलंडच्या डावात 8 षटकार आणि 10 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 29 धावा जमविताना 4 गडी गमाविले. डिव्हाईनने 39 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह तर ग्रीनने 41 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह अर्धशतक झळकाविले. या जोडीने पाचव्या गड्यासाठी शतकी भागिदारी 69 चेंडूत तर दीडशतकी भागिदारी 94 चेंडूत नोंदविली. इंग्लंडतर्फे लिंसे स्मिथने 25 धावांत 3 तर बेलने 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडच्या डावात सलामीच्या डंक्लेने 18 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह 26, कॅप्सेने 19 चेंडूत 2 चौकारांसह 22, बाऊचरने 33 चेंडूत 3 चौकारांसह 38, नाईटने 23 चेंडूत 2 चौकारांसह 25, केंपने 2 चौकारांसह 14 तर गिब्सनने 2 चौकारांसह 12 आणि वाँगने 3 चेंडूत 1 षटकारासह नाबाद 8 धावा केल्या. इंग्लंडच्या डावात 2 षटकार आणि 15 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 49 धावा जमविताना 1 गडी गमाविला. न्यूझीलंडतर्फे नेन्सी पटेलने 25 धावांत 2 तर इलिंग, ताहुहु आणि मेली केर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक - न्यूझीलंड 20 षटकात 5 बाद 170 (सोफी डिव्हाईन 87, मॅडी ग्रीन नाबाद 56, अवांतर 20, स्मिथ 3-25, बेल 1-22), इंग्लंड 20 षटकात 6 बाद 156 (डंक्ले 26, कॅप्से 22, बाऊचर 38, नाईट 25, केम्प 14, गिप्सन 12, अवांतर 10, नेन्सी पटेल 2-25, इलिंग, ताहुहु, मेली केर प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :

.