न्यूझीलंड-विंडीज पहिली कसोटी अनिर्णीत
सामनावीर ग्रिव्ह्सचे नाबाद द्विशतक, होपचे शतक
वृत्तसंस्था / ख्राईस्टचर्च
जस्टीन ग्रिव्ह्सचे नाबाद द्विशतक तसेच शाय होपचे शतक आणि रॉचच्या समयोचित अर्धशतकाच्या जोरावर विंडीजने यजमान न्यूझीलंडविरुद्धची पहिली क्रिकेट कसोटी शनिवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी अनिर्णीत राखली.
या सामन्यात न्यूझीलंडने विंडीजला निर्णायक विजयासाठी 531 धावांचे कठीण आव्हान दिले होते. विंडीजने 4 बाद 212 या धावसंख्येवरुन शेवटच्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला आणि त्यांनी दुसऱ्या डावात 163.3 षटकांत 6 बाद 457 धावा जमवित न्यूझीलंडला विजयापासून अलिप्त राखले. ग्रिव्ह्सने तब्बल साडेनाऊ तास खेळपट्टीवर राहून शाय होपसमवेत पाचव्या गड्यासाठी 196 धावांची भागिदारी केली. त्यानंतर ग्रिव्ह्सने रॉचसमवेत सातव्या गड्यासाठी 180 धावांची अभेद्य भागिदारी केली. शेवटच्या दिवशीच्या खेळामध्ये न्यूझीलंडच्या गोलंदाजांना केवळ विंडीजचे दोन गडी बाद करता आले. कसोटी क्रिकेटमध्ये विंडीजला शेवटच्या डावात दिलेले 531 धावांचे आव्हान हे सर्वोच्च आहे.
होपने 234 चेंडूत 2 षटकार आणि 15 चौकारांसह 140 धावा झोडपल्या. उपाहारापर्यंत विंडीजने 102 षटकांत 6 बाद 295 धावांपर्यंत मजल मारली होती. या कालावधीत न्यूझीलंडने दुसरा ना चेंडू घेतला. खेळाच्या पहिल्या सत्रात विंडीजने विंडीजने दोन गडी गमविताना 83 धावा जमविल्या. डफीने शाय होपला लॅथमकरवी झेलबाद केले. त्यानंतर फोकेसने इमलेचला 4 धावांवर पायचित केले.
उपाहारानंतर ग्रिव्ह्सने आपले शतक 229 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीने झळकविले. चहापानापर्यंतच्या सत्रात आपले दीड शतक पूर्ण केले. चहापानावेळी विंडीजने 131 षटकांत 6 बाद 399 धावा जमविल्या होत्या. विंडीजने या सत्रात 104 धावांची भर घातली. ग्रिव्ह्सला रॉचकडून शेवटपर्यंत चांगली साथ मिळाली. ग्रिव्ह्सने 384 चेंडूत 19 चौकारांसह आपले द्विशतक पूर्ण केले. दरम्यान रॉचने चहापानापूर्वी आपले अर्धशतक 8 चौकारांच्या मदतीने 110 चेंडूत झळकविले. ग्रिव्ह्सने 388 चेंडूत 19 चौकारांसह नाबाद 202 तर रॉचने 233 चेंडूत 8 चौकारांसह नाबाद 58 धावा जमविल्या. या जोडीने विंडीजला अखेर ही कसोटी अनिर्णीत राखून देण्यात यश मिळविले. न्यूझीलंडतर्फे डफीने 122 धावांत 3 गडी तर हेन्री, ब्रेसवेल आणि फोकेस यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. ग्रिव्ह्सचे कसोटी क्रिकेटमधील हे पहिले द्विशतक आहे. या पहिल्या कसोटीत दोन्ही संघांकडून 1321 धावा झोडपल्या गेल्या. उभय संघात ही तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जात असून आता उर्वरित दोन कसोटींमध्ये चांगली चुरस पहावयास मिळेल. आता उभय संघातील दुसरी कसोटी येत्या बुधवारपासून सुरू होईल. आयसीसीच्या नव्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप सायकल अंतर्गत न्यूझीलंड आणि विंडीज यांनी प्रत्येकी समान चार गुण मिळविले आहेत.
संक्षिप्त धावफलक: न्यूझीलंड प. डाव 231, विंडीज प. डाव 167, न्यूझीलंड दु. डाव 8 बाद 466 डाव घोषित, विंडीज दु. डाव 163.3 षटकांत 6 बाद 457 (जस्टीन ग्रिव्ह्स नाबाद 202, शाय होप 140, रॉच नाबाद 58, अवांतर 23, डफी 3-122, हेन्री, फोकेस,ब्रेसवेल प्रत्येकी 1 बळी).