न्यूझीलंडचा मालिका विजय, जेकब डफीला दुहेरी मुकुट
पाचव्या टी-20 सामन्यात विंडीजचा 8 गड्यांनी पराभव, जेकब डफीला सामनावीर व मालिकावीर
वृत्तसंस्था/ड्युनेडीन
पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत यजमान न्यूझीलंडने विंडीजचा 3-1 अशा फरकाने पराभव केला. या मालिकेतील गुरूवारी येथे खेळविण्यात आलेल्या शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडने विंडीजवर 8 गडी राखून मोठा विजय मिळविला. न्यूझीलंड संघातील जेकब डफीला ‘मालिकावीर’ व ‘सामनावीर’ असा दुहेरी मुकुट मिळाला. गुरूवारच्या शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजी दिली. विंडीजचा डाव 18.4 षटकात 140 धावांत आटोपला. त्यानंतर न्यूझीलंडने 15.4 षटकात 2 बाद 141 धावा जमवित हा सामना 8 गड्यांनी जिंकला.
विंडीजच्या डावामध्ये रॉस्टन चेसने 32 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 38, रोमारियो शेफर्डने 22 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह 36, होल्डरने 19 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 20, कर्णधार होपने 5 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 11 धावा जमविल्या. विंडीजच्या 3 फलंदाजांना खाते उघडता आले नाही. न्यूझीलंडतर्फे डफीने 35 धावांत 4 तर नीशमने 31 धावांत 2, जेमिसन ब्रेसवेल, सोधी आणि सँटनर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. विंडीजने पावरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 47 धावा जमविताना 4 गडी गमविले. 10 षटकाअखेर विंडीजची स्थिती 5 बाद 75 अशी होती. विंडीजच्या डावामध्ये 7 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना रॉबिनसन आणि कॉन्वे या सलामीच्या जोडीने 43 चेंडूत 79 धावांची भागिदारी केली. डावातील आठव्या षटकात विंडीजच्या शेफर्डने रॉबिनसनचा त्रिफळा उडविला. त्याने 24 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह 45 धावा जमविल्या. नंतर कॉन्वेने रचिन रवींद्रसमवेत दुसऱ्या गड्यासाठी 37 धावांची भागिदारी केली. स्प्रिंगरने रचिन रवींद्रला बाद केले. त्याने 16 चेंडूत 1 षटकार, 2 चौकारांसह 21 धावा जमविल्या. नंतर कॉन्वे व चॅपमन यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. कॉन्वेने 42 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 47 तर चॅपमनने 13 चेंडूत 2 षटकारासह नाबाद 21 धावा जमविल्या. न्यूझीलंडच्या डावात 7 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडने पावरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 61 धावा जमविल्या. 10 षटकाअखेर न्यूझीलंडची स्थिती 1 बाद 91 अशी होती. विंडीजतर्फे शेफर्ड आणि स्प्रिंगर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या मालिकेतील गेल्या सोमवारचा चौथा सामना पावसामुळे वाया गेला होता. या संपूर्ण मालिकेत 10 बळी मिळविणाऱ्या डफीची मालिकावीर तसेच सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.
संक्षिप्त धावफलक
विंडीज 18.4 षटकात सर्वबाद 140 (शेफर्ड 36, चेस 38, होल्डर 20, पॉवेल 11, होप 11, अवांतर 6, डफी 4-35, नीशम 2-31, जेमिसन, ब्रेसवेल, सोधी, सँटनर प्रत्येकी 1 बळी), न्यूझीलंड 15.4 षटकात 2 बाद 141 (कॉन्वे नाबाद 47, रॉबिनसन 45, रचिन रवींद्र 21, चॅपमन नाबाद 21, अवांतर 7, शेफर्ड व स्प्रिंगर प्रत्येकी 1 बळी).