न्यूझीलंडची इंग्लंडवर 224 धावांची आघाडी
इंग्लंड पहिल्या डावात 100 धावांनी पिछाडीवर, हेन्रीचे 5 बळी
वृत्तसंस्था, ओव्हल
येथे सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत शुक्रवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी शेवटची बातमी हाती आली त्यावेळी न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 2 बाद 124 धावा जमवित एकूण इंग्लंडवर 224 धावांची आघाडी मिळविली आहे. न्यूझीलंडने यजमान इंग्लंडवर पहिल्या डावात 100 धावांची बढत घेतली.
या कसोटी मालिकेतील लॉर्ड्सची पहिली कसोटी इंग्लंडने एकतर्फी जिंकून न्यूझीलंडवर आघाडी घेतली आहे. या दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने पहिल्या डावात 391 धावा जमविल्या. त्यानंतर इंग्लंडने 6 बाद 222 या धावसंख्येवरुन तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे सुरुवात केली आणि त्यांचा पहिला डाव 291 धावांवर आटोपला. इंग्लंडचे शेवटचे चार गडी 69 धावांची भर घालत तंबूत परतले. गेने 9 चौकारांसह 53, फिशरने 6 चौकारांसह नाबाद 50, कर्णधार रूटने 8 चौकारांसह 46, डकेटने 5 चौकारांसह 36, कॉक्सने 3 चौकारांसह 27 आणि ब्रुकने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 24 धावा केल्या. न्यूझीलंडतर्फे मॅट हेन्री सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 80 धावांत 5 गडी बाद केले. ओरुरकेने 2 तर जेमिसन आणि स्मिथ यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
100 धावांची आघाडी मिळविल्यानंतर न्यूझीलंडने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली. कर्णधार लॅथम आणि कॉन्वे हे दोन सलामीचे फलंदाज केवळ 28 धावांत तंबूत परतले. आर्चरने लॅथमला 4 धावांवर तर टंगने कॉन्वेला 11 धावांवर बाद केले. निकोल्स आणि रचिन रविंद्र यांनी संघाचा डाव सावरताना तिसऱ्या गड्यासाठी शेवटची बातमी हाती आली त्यावेळी अभेद्य 96 धावांची भागिदारी केली. निकोल्स 8 चौकारांसह 61 तर रचिन रविंद्र 9 चौकारांसह 43 धावांवर खेळत आहे. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 2 बाद 124 धावा जमवित इंग्लंडवर 224 धावांची आघाडी मिळविली आहे.
संक्षिप्त धावफलक: न्यूझीलंड प. डाव 391, इंग्लंड प. डाव सर्वबाद 291 (गे 53, फिशर नाबाद 50, रूट 46, ब्रुक 24, डकेट 36, कॉक्स 27, अवांतर 9, हेन्री 5-80, ओरुरके 2-68, स्मिथ व जेमिसन प्रत्येकी 1 बळी), न्यूझीलंड दु. डाव 29 षटकांत 2 बाद 124 (लॅथम 4, कॉन्वे 11, निकोल्स खेळत आहे 61, रचिन रविंद्र खेळत आहे 43, आर्चर व टंग प्रत्येकी 1 बळी).
धावफलक अपूर्ण