टी-20 वर्ल्डकपसाठी न्यूझीलंड संघ जाहीर
मिचेल सँटनरकडे सूत्रे : फिन अॅलन, मार्क चॅपमनचे कमबॅक
वृत्तसंस्था/ ऑकलंड
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने आगामी टी-20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय संघाची बुधवारी घोषणा केली आहे. संघाची कमान अनुभवी फिरकी अष्टपैलू मिचेल सँटनरकडे सोपवण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन आणि मॅट हेन्री स्पर्धेदरम्यान काही सामन्यांमधून बाहेर राहू शकतात. दरम्यान, किवीज संघाची स्पर्धेतील पहिली लढत दि. 8 फेब्रुवारी रोजी अफगाणिस्तानविरुद्ध होईल.
न्यूझीलंडच्या संघात जलदगती गोलंदाज जेकब डफीला देखील स्थान मिळाले आहे. मागील वर्षातील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याने आपली जागा निश्चित केली आहे. तो पहिल्यांदा टी-20 वर्ल्ड कप खेळताना दिसेल. डफीने गतवर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, मात्र अल्पावधीतच आपल्या प्रभावी गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. याशिवाय, फिन ऍलन आणि मार्क चॅपमनचे संघात कमबॅक झाले आहे. दोन्ही खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर होते, पण आता ते पूर्णपणे तंदुरुस्त असून निवडीसाठी उपलब्ध आहेत.
वर्ल्डकपसाठी संघात समतोल
दरम्यान, भारतात होणाऱ्या या वर्ल्डकपासाठी किवीज निवड समितीने संघात ईश सोढी, मायकेल ब्रेसवेल, ग्लेन फिलिप्स आणि रचिन रवींद्र यांच्यावर फिरकीची जबाबदारी असणार आहे. ईश सोढी न्यूझीलंडसाठी टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज आहे. याशिवाय, वेगवान गोलंदाजीची जबाबदारी लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, अॅडम मिल्ने आणि जेम्स नीशम सांभाळतील. फलंदाजी विभागात डेव्हॉन कॉनवे, डॅरिल मिचेल, टीम सीफर्ट, फिन ऍलन आणि मार्क चॅपमन यांना स्थान देण्यात आले आहे.
टी-20 वर्ल्डकपसाठी न्यूझीलंड संघ : मिचेल सँटनर (कर्णधार), फिन अॅलन, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, डॅरिल मिचेल, अॅडम मिल्ने, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, टिम सिफर्ट, ईश सोढी.
पाच खेळाडू दुखापतग्रस्त
न्यूझीलंडचे पाच प्रमुख खेळाडू सध्या दुखापतीतून सावरत आहेत, मात्र वर्ल्ड कपपर्यंत ते फिट होण्याची शक्यता आहे. यामध्ये फिन अॅलन, मार्क चॅपमन, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, मिचेल सँटनर यांचा समावेश आहे. स्पर्धेदरम्यान लॉकी फर्ग्युसन आणि मॅट हेन्री यांना मॅटर्निटी लीव्ह मिळू शकते. दरम्यान, टी-20 विश्वचषकापूर्वी न्यूझीलंड संघ भारत दौऱ्यावर येत आहे. उभय संघांत पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार असून या मालिकेतील पहिला सामना दि. 11 रोजी होणार आहे.