टीम इंडियाविरुद्ध कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड संघ जाहीर
केन विल्यम्सन पहिल्या कसोटीला मुकणार
वृत्तसंस्था/ ऑकलंड
भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी न्यूझीलंडला मोठा झटका बसला आहे. बुधवारी न्यूझीलंडचा कसोटी संघाची घोषणी झाली, पण माजी कर्णधार केन विल्यमसन बेंगळूर येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध असणार नाही. मांडीला दुखापत झाली असल्याने तो पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. टॉम लॅथमकडे नेतृत्वाची धुरा असणार आहे. दरम्यान, उभय संघातील पहिली कसोटी 16 ते 20 ऑक्टोबर दरम्यान बेंगळूर येथे खेळवली जाणार आहे.
न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विल्यमसन उशिराने टीम इंडियाला पोहोचेल. याआधी, श्रीलंकेविरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटीदरम्यान विल्यमसनला मांडीचा त्रास झाला होता. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड संघात सामील होण्यासाठी त्याला थोडावेळ लागणार असल्याचे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे. आगामी काळातील व्यस्त वेळापत्रक पाहता विल्यम्सनला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे तो पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यास दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध असेल, असे किवीज क्रिकेट मंडळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
तसेच विल्यम्सन ऐवजी मायकेल ब्रेसवेल फक्त पहिला कसोटी सामना खेळणार आहे. तर ईश सोढी दुसरा आणि तिसरा कसोटी सामना खेळणार आहे. विशेष म्हणजे न्यूझीलंडने मार्क चॅम्पमनचा देखील कसोटी संघात समावेश केला आहे. अनुभवी टॉम लॅथमकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली असून रचिन रविंद्र, टीम साऊदी, मिचेल सँटेनर, डेव्हॉन कॉनवे या अनुभवी खेळाडूंचीही संघात वर्णी लागली आहे.
भारताविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी न्यूझीलंड संघ -
टॉम लॅथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल (फक्त पहिली कसोटी), मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, विल ओरुके, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटेनर, बेन सीयर्स, ईश सोढी (केवळ दुसरी आणि तिसरी कसोटी), टीम साऊदी, केन विल्यम्सन, विल यंग.