भारताच्या मालिकेसाठी न्यूझीलंडने केली 7 वेगवान गोलंदाजांची निवड
वृत्तसंस्था, वेलिंग्टन
22 ऑक्टोबरपासून क्राइस्टचर्चमध्ये सुरू होणाऱ्या विद्यमान विश्वविजेत्या भारतासोबत खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी न्यूझीलंडने सात प्रमुख वेगवान गोलंदाजांची निवड केली आहे. यात दुखापतीतून सावरलेल्या अॅडम मिल्नेचाही समावेश आहे.
चार शहरांध्ये 11 दिवसांत खेळल्या जाणाऱ्या या रोमांचक पाच सामन्यांच्या मालिकेसाठी व्हाईटबॉल संघाचा कर्णधार मिचेल सँटनर 16 खेळाडूंच्या विस्तारीत टी-20 संघाचे नेतृत्व करेल.
या वर्षीच्या आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषकात उपविजेतेपद मिळवणाऱ्या संघातील 13 खेळाडूंची या मायदेशातील मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये फिरकी अष्टपैलू मायकल ब्रेसवेल आणि वेगवान गोलंदाज मिल्ने यांचाही समावेश आहे, जे दुखापतींमुळे विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडले होते. 34 वर्षीय मिल्नेने आतापर्यंत 243 टी-20 सामने (त्यापैकी 56 आंतरराष्ट्रीय आहेत) खेळले आहेत. त्याने ब्लॅक कॅप्ससाठी (न्यूझीलंड संघ) शेवटचा सामना एका वर्षांपूर्वी झिम्बाब्वेविरुद्ध खेळला होता. आता तो लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, काईल जेमिसन आणि जेकब डफी यासारख्या अनुभवी वेगवान गोलंदाजांच्या फळीला तसेच झॅक फोक्स आणि नॅथन स्मिथ यासारख्या युवा खेळाडूंना बळकटी देईल.
गेल्या आठवड्यात एका प्रमोशनला शूटदरम्यान उजव्या खांद्याला दुखापत (खांदा निखळणे) झाल्यामुळे, फलंदाज-अष्टपैलू रचिन रवींद्र या मालिकेतून बाहेर पडला आहे. रविंद्रच्या सुमारे सहा आठवडे दूर राहण्याची शक्यता आहे. 4 नोव्हेंबरपासून ऑकलंडमधील ईडन पार्कवर सुरू होणाऱ्या भारतासोबतच्या एकदिवशीय मालिकेसाठी उपलब्ध होण्याच्x त्याचे उद्दिष्ट आहे. विशेष म्हणजे या बहुप्रतिक्षित 12 सामन्यांच्या दौऱ्यात पाच एकदिवशीय आणि दोन कसोटी सामन्यांचाही समावेश आहे. पहिल्या सामन्याला अजून एक महिना बाकी असतानाच 76,000 हून अधिक तिकिटे विकली गेली असून हा दौरा न्यूझीलंड क्रिकेटचे तिकीट विक्रीचे सर्व विक्रम मोडण्याच्या मार्गावर आहे.
न्यूझीलंड संघ : फिन अॅलन, मॅट हेन्री, ग्लेन फिलिप्स, जॅक फोक्स, मायकल ब्रेसवेल, अॅडम मिल्ने, मिचेल सँटनर (कर्णधार), बेव्हन जेकब्स, जेकब डफी, डॅरिल मिचेल, टिम सायफर्ट, मार्क चॅपमन, काईल जेमिसन, डेव्हन कॉनवे, नॅथन स्मिथ, लॉकी फर्ग्युसन.
सामन्यांचे वेळापत्रक
पहिली टी-20, 22 ऑक्टोबर : हॅगली ओव्हल, क्राईस्टचर्च
दुसरी टी-20, 24 ऑक्टोबर : हॅगली ओव्हल, क्राइस्टचर्च
तिसरी टी-20, 27 ऑक्टोबर : हेन्री स्टेडियम, वेलिंग्टन
चौथी टी-20, 30 ऑक्टोबर : ईडन पार्क, ऑकलंड
पाचवी टी-20, 1 नोव्हेंबर : सेडन पार्क, हॅमिल्टन