न्यूझीलंडच्या वनडे संघाची घोषणा
चॅपमन, रचिन रविंद्र मालिकेतून बाहेर, निकोल्स, सिफर्टला संधी
वृत्तसंस्था, ऑकलंड
यजमान न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या वनडे मालिकेला बुधवार 4 नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. न्यूझीलंडच्या निवड समितीने मार्क चॅपमन आणि रचिन रविंद्र या फलंदाजांना दुखापतीमुळे मालिकेतून वगळले आहे. तर हेन्री निकोल्स आणि सिफर्ट यांना संघात स्थान देण्यात आले आहे.
मार्क चॅपमनला स्नायु दुखापत झाली असून ती अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही. तसेच काही दिवसांपूर्वी खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे रचिन रविंद्रला काही सामने खेळता आले नव्हते. चॅपमनच्या दुखापतीचे एमआरआय स्कॅनिंग करण्यात आले. या स्कॅनिंगनंतर चॅम्पनला पुन्हा तंदुरुस्त होण्यासाठी किमान दोन आठवड्यांचा कालावधी लागेल, असे सांगण्यात आले. न्यूझीलंड संघातील फलंदाज रचिन रविंद्र याला गेल्या काही दिवसांपासून वारंवार खांदा दुखापतीची समस्या जाणवत असल्याने तो मैदानावर क्षेत्ररक्षण करू शकला नाही. रचिन रविंद्रला डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला असल्याने त्याला भारताविरुद्धच्या मालिकेत खेळता येणार नाही.
क्रिकेट न्यूझीलंडने या वनडे मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी तसेच शेवटच्या दोन सामन्यांसाठी स्वतंत्र संघांची घोषणा केली आहे. हेन्री निकोल्सला पहिल्या तीन सामन्यांत खेळविले जाणार आहे तर फॉक्सक्रॉप्टला चौथ्या आणि पाचव्या सामन्यात संधी मिळणार आहे. मॅट हेन्रीने पहिल्या तीन सामन्यांसाठी संघात स्थान मिळाले आहे. तर मॅट फिशर चौथ्या आणि पाचव्या वनडे सामन्यात खेळेल, अशी माहिती न्यूझीलंडचे प्रमुख प्रशिक्षक रॉब वॉल्टर यांनी दिली आहे. या वनडे मालिकेनंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. भारतीय संघाने न्यूझीलंडच्या दौऱ्याला शानदार टी-20 मालिकाविजयाने प्रारंभ केला आहे. आता वनडे मालिकेत भारतीय संघ पुन्हा नव्या जोमाने जेतेपदासाठी प्रयत्न करेल.
न्यूझीलंड संघ (पहिल्या तीन सामन्यांसाठी) : मिचेल सँटनर (कर्णधार), मिचेल ब्रेसवेल, देवॉन कॉन्वे, डफी, फिशर, हेन्री, जेमिसन, लॅथम, मिचेल, निकोल्स, फिलिप्स, सिफर्ट, नाथन स्मिथ, यंग आणि टिकनर.
न्यूझीलंड संघ (शेवटच्या दोन सामन्यांसाठी) : मिचेल सँटनर (कर्णधार), अॅलेन, मिचेल ब्रेसवेल, ख्रिस्टेन क्लार्क, डफी, फिशर, फॉक्सक्रॉप्ट, फर्ग्युसन, मिचेल हे, निक केली, सिफर्ट, टिकनर आणि यंग.
