न्यूझीलंडची झिम्बाब्वेवर 436 धावांची आघाडी
कॉनवे, निकोल्स, रचिन रविंद्र यांची दमदार शतके
वृत्तसंस्था / बुलावायो
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील येथे सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने आपली स्थिती अधिक मजबूत करत विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. या सामन्यातील शुक्रवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर न्यूझीलंडने झिम्बाब्वेवर 436 धावांची मजबूत आघाडी घेतली आहे. न्यूझीलंड संघातील देवॉन कॉनवे, हेन्री निकोल्स आणि रचिन रवींद्र यांनी शानदार शतके झळकविली. दिवसअखेर न्यूझीलंडने पहिल्या डावात 3 बाद 601 धावा जमविल्या. तत्पूर्वी झिम्बाब्वेचा पहिला डाव 125 धावांत आटोपला होता.
या दुसऱ्या कसोटीतील खेळाच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडच्या भेदक गोलंदाजीसमोर झिम्बाब्वेचा पहिला डाव 48.5 षटकात 125 धावांत उखडला. न्यूझ्^ााrलंडच्या हेन्रीने 40 धावांत 5 तर फोकेसने 38 धावांत 4 तसेच फिशरने 1 गडी बाद केला. न्यूझीलंडने पहिल्या दिवसाअखेर 1 बाद 174 धावा जमविल्या होत्या. या धावसंख्येवरुन त्यांनी दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. कॉनवे आणि यंग यांनी सलामीच्या गड्यासाठी 35 षटकात 162 धावांची भागिदारी केली. यंगने 101 चेंडूत 11 चौकारांसह 74 धावा जमविल्या. झिम्बाब्वेच्या गेवाँदुने यंगचा त्रिफळा उडाविला. कॉनवे आणि डफी यांनी दुसऱ्या गड्यासाठी 73 धावांची भर घातली. मासेकेसाने डफीला झेलबाद केले. त्याने 6 चौकारांसह 36 धावा केल्या.
कॉनवे आणि निकोल्स यांनी तिसऱ्या गड्यासाठी 110 धावांची शतकी भागिदारी केली. कॉन्वेने 245 चेंडूत 18 चौकारांसह 153 धावा झोडपल्या. उपाहारावेळी न्यूझीलंडने 71 षटकात 2 बाद 306 धावा जमविल्या होत्या. उपाहारानंतर कॉन्वे मुझारबनीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. निकोल्स आणि रचिन रवींद्र यांनी दमदार फलंदाजी करत आपल्या संघाला सुस्थितीत नेले. रचिन रवींद्र आणि निकोल्स यांनी चौथ्या गड्यासाठी 356 धावांची अभेद्य त्रिशतकी भागिदारी केली. दिवसअखेर न्यूझीलंड पहिल्या डावात 130 षटकात 3 बाद 601 धावा केल्या. निकोल्स 15 चौकारांसह 150 तर रचिन रवींद्र 139 चेंडूत 2 षटकार आणि 21 चौकारांसह 165 धावांवर खेळत आहेत. चहापानावेळी न्यूझीलंडची स्थिती 3 बाद 427 अशी होती. न्यूझीलंडने खेळाच्या शेवटच्या सत्रात एकही गडी न गमविता 174 धावा घेतल्या. या कसोटीतील खेळाचे तीन दिवस बाकी असून न्यूझीलंडचा संघ मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
संक्षिप्त धावफलक: झिम्बाब्वे प. डाव 48.5 षटकात सर्वबाद 125 (टेलर 44, सिगा नाबाद 33, हेन्री 5-40, फोकेस 4-38, फिशर 1-16), न्यूझीलंड प. डाव 130 षटकात 3 बाद 601 (कॉनवे 153, यंग 74, डफी 36, निकोल्स खेळत आहे 150, रचिन रवींद्र खेळत आहे 165, अवांतर 23, मुझारबनी, गेवाँदु आणि मासेकेसा प्रत्येकी 1 बळी).