भारतीय महिलांसमोर आजपासून विश्वचषक विजेत्या न्यूझीलंडचे आव्हान
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
भारत महिला क्रिकेट संघाने पुढील वर्षीच्या विश्वचषकाची तयारी सुरू केली असून आज गुरुवारपासून येथे होणारी न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका ही त्याची सुरुवात आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरसाठी ही एक अग्निपरीक्षा असेल. कारण संयुक्त अरब अमिरातीमध्ये नुकत्याच झालेल्या टी-20 विश्वचषकादरम्यान तिच्या नेतृत्वाव टीका झालेली असल्याने कौरसाठी ही मालिका महत्त्वाची ठरेल. विश्वचषकात कौर संघाची सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली असली, तरी भारत गट स्तर पार करू शकला नाही.
संयुक्त अरब अमिरातीतील कामगिरी पाठीमागे टाकून भारत आपली गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, न्यूझीलंड संघ सध्या फॉर्मात आहे. कारण त्यांनी विश्चचषक जिंकताना ऑस्ट्रेलियाविऊद्धचा त्यांचा गट सामना वगळता संपूर्ण स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करून दाखविलेली आहे. अलीकडच्या काळात नेतृत्वाबाबत प्रश्न उठूनही 35 वर्षीय कौरने कर्णधार म्हणून तिची जागा कायम ठेवली आहे आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत तिला फटकेबाज यष्टीरक्षक-फलंदाज रिचा घोषच्या सेवेशिवाय जबाबदारी पेलावी लागेल. रिचाला बारावीची परीक्षा द्यायची असल्याने ती या मालिकेत खेळणार नाही.
अनुभवी अष्टपैलू आशा शोभना हिला देखील मुकावे लागणार आहे. कारण ती दुखापतग्रस्त आहे आणि ती निवडीसाठी उपलब्ध होऊ शकली नाही. विश्वचषक स्पर्धेदरम्यान दुखापत झालेली वेगवान गोलंदाज पूजा वस्त्रकारला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. संघात काही नवोदित खेळाडूंचा समावेश असून तेजल हसबनीस, सायमा ठाकूर आणि प्रिया मिश्रा यांना प्रथमच बोलावणे आले आहे. अशा परिस्थितीत शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना या सलामीच्या जोडीकडून खूप अपेक्षा असतील. या जोडीला टी-20 विश्वचषकात अधूनमधून चमक दाखविता आली.
भारताच्या दृष्टिकोनातून मानधना आणि शेफालीने जबरदस्त सुरुवात करून देणे महत्त्वाचे आहे. नेहमीप्रमाणे, कौर आणि जेमिमा रॉड्रिग्स यांच्यावर मधल्या फळीचे नेतृत्व करण्याची जबाबदारी असेल. परंतु भारताला फटकेबाज घोषची अनुपस्थिती जाणवेल. तिन्ही सामने नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहेत.
संघ-भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, डी. हेमलता, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, यास्तिका भाटिया, उमा चेत्री, सायली सतगरे, अऊंधती रे•ाr, रेणुका सिंह ठाकूर, तेजल हसबनीस, सायमा ठाकूर, प्रिया मिश्रा, राधा यादव, श्रेयंका पाटील.
न्यूझीलंड : सोफी डेव्हाईन (कर्णधार), सुझी बेट्स, ईडन कार्सन, लॉरेन डाउन, इझी गेज, मॅडी ग्रीन, ब्रूक हॅलिडे, पॉली इंग्लिस, फ्रॅन जोनास, जेस केर, मेली केर, मॉली पेनफोल्ड, जॉर्जिया प्लिमर, हाना रो, लिया ताहुहू.
सामन्याची वेळ : दुपारी 1.30 वा.