विश्वचषकासाठी आज न्यूझीलंड, द. आफ्रिका आमनेसामने
वृत्तसंस्था/ दुबई
प्रेरणादायी सोफी डिव्हाईनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडला आज रविवारी येथे टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या शिखर सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सामना करताना आयसीसी विश्वचषक खात्यात जमा करण्याची शेवटची संधी असेल. न्यूझीलंडच्या महिला संघाने 2000 मध्ये एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक जिंकला होता. परंतु सध्याच्या संघातील एकही सदस्य त्या ऐतिहासिक यशाचा भाग नव्हता.
ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी न्यूझीलंडने ‘टी-20’मधील 10 सामने गमावले होते, परंतु डिव्हाईनच्या नेतृत्वाखालील सुझी बेट्स आणि अॅमेलिया केर यांचा समावेश असलेल्या या संघाने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. डिव्हाईन, बेट्स आणि ली ताहुहू या विश्वचषकात राष्ट्रीय संघाकडून खेळण्याची ही बहुदा शेवटची वेळ असेल. 35 वर्षीय डिव्हाईनने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये 7000 हून अधिक धावा केल्या आहेत, तर 37 वर्षीय बेट्सच्या नावावर 10,000 हून अधिक धावा आहेत. 34 वर्षीय वेगवान गोलंदाज ताहुहूच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 112 आणि टी-20 मध्ये 93 बळी आहेत. आपल्या खात्यात विश्वचषक जमा करण्यासाठी त्या कोणतीही कसर सोडणार नाहीत.
दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका संघ तितकाच निर्धार करून उतरेल. कारण 2023 च्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये ते ऑस्ट्रेलियाकडून मायदेशात पराभूत झाले होते. त्या चुरशीच्या लढतीत केवळ 19 धावांनी पराभूत झाल्यामुळे त्यांना सतावणाऱ्या वेदनादायक आठवणी पुसून टाकण्याची ही संधी आहे. न्यूझीलंडकडे वेळेप्रसंगी संघाला सावरण्यासाठी आवश्यक खेळाडू आहेत. केरने स्पर्धेत मिळविलेल्या बळींची संख्या 12 वर पोहोचली असून ईडन कार्सन (8), रोझमेरी मायर (7) आणि अनुभवी ली ताहुहू यांच्याकडून तिला दुसऱ्या बाजूने योग्य साथ मिळालेली आहे.
न्यूझीलंडने प्रथम भारताविऊद्ध मोठा विजय मिळवून आपले इरादे जाहीर केले आणि त्यानंतर सातत्यपूर्ण कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाकडून 60 धावांनी पराभव पत्करावा लागला, तरीही किवीज खेळाडू निराश झाल्या नाहीत. त्यांनी उपांत्य फेरीत शेवटच्या षटकात वेस्ट इंडिजला हरवून तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियन संघाला गेल्या 15 वर्षांत सलग आठव्यांदा अंतिम फेरी गाठण्यापासून रोखून इतिहास रचलेला आहे. त्यांच्या वरच्या फळीतील दोन फलंदाज लॉरा वोल्वार्ड (190 धावा) आणि तझमिन ब्रिट्स (170 धावा) या स्पर्धेतील फलंदाजीच्या क्रमवारीत शीर्षस्थानी आहेत. त्यांच्यावर बरेच काही अवलंबून असेल. तसेच दक्षिण आफ्रिकेचे अष्टपैलू सामर्थ्य न्यूझीलंडसमोर कठीण आव्हान उभे करेल.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.