For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नववर्षाचे नवसंकल्प... धर्मज्ञान-राष्ट्रज्ञान प्राप्त करुया

06:48 AM Mar 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
नववर्षाचे नवसंकल्प    धर्मज्ञान राष्ट्रज्ञान प्राप्त करुया
Advertisement

आपणस काय हवे? आनंद की चैतन्य? आनंद क्षणभंगूर, तर चैतन्य दीर्घकाळ! काही गोष्टींतून आनंदच मिळतो, तर काहींतून आनंदाबरोबरच चैतन्यही प्राप्त होते. “गर्व से कहो हम हिंदू है।” म्हटले नाही तरी चालेल, “जय श्रीराम” म्हटले नाही तरी चालेल, “जय भवानी, जय शिवाजी” म्हटले नाही, तरीही चालेल पण अंतर्यामी हिंदुत्व मात्र असायलाच हवे. हिंदुत्व हेच भारतीयत्व ! भारतीयत्व हेच विश्वबंधुत्व ! विश्वबंधुत्व हेच मनुष्यत्व ! मनुष्यत्व हेच सर्वश्रेष्ठत्व!

Advertisement

आज गुढीपाडवा. आपल्या राष्ट्रीय वर्षाचा पहिला दिवस. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशिर्ष, पौष, माग, फाल्गून हे वर्षाचे बारा महिने. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा वर्षाचा पहिला दिवस, याच दिवशी ब्रम्हदेवाने सृष्टीच्या निर्मितीस प्रारंभ केला, म्हणून हा दिवस घरासमोर गुढी उभारुन म्हणजे ‘ब्रम्हध्वज’ उभारुन साजरा करण्यात येतो. हिंदु शास्त्रानुसार कोणत्याही उत्सवाच्या पावन पर्वात, आपला जन्म व मृत्यू यामध्ये असलेले जीवन सुफळ व्हावे, म्हणून निसर्गदेवतेसह अन्य देवांचे पूजन करुन कृतज्ञता व्यक्त करावी, असा संकल्प आहे. गुढीपाडव्याला ब्रम्हदेवाप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करुन वर्षभरासाठी नवसंकल्प करुन ते तडीस नेण्यासाठी संकल्पबद्ध राहणे, असा उदात्त हेतु या गुढीपाडव्यामागे आहे.

गुढी हे विजयाचे प्रतिक. गुढीला बांधायच्या आंब्याच्या डहाळ्या व कडू निबांची पाने म्हणजे आरोग्य व समृद्धी आहे. गुढीवर पालथा घातलेला तांब्याचा कलश म्हणजे वरुण देवाची कृपा व्हावी, वर्षभर पुरेसे पर्जन्यमान होऊन मानवी कल्याण व्हावे, असा भाव आहे. सकाळी श्रीगणेशपूजा व अन्य देवतांना वंदन करुन घरासमोर पाटावर गुढी उभारावी. सांस्कृतिक रांगोळी, तसेच फुलांची आरास करुन परिसर मंगलमय करावा. गुढीरोहण सूर्योदयानंतर सुरु करायचे असते. आज सूर्योदय 6 वाजून 45 मिनिटांनी होणार आहे, आणि त्यानंतर 6 वाजून 53 मिनिटांनी अमावस्या संपणार आहे. त्यानंतर प्रतिपदा सुरु होणार असल्याने गुढीरोहण यावेळेनंतर करणे उचित आहे.

Advertisement

गुढीपाडवा हे आपल्या नववर्षाचा पहिला दिवस असल्याने पुढील वर्षासाठी आपण काही संकल्प आवश्य करायला हवेत. आपण हिंदु असल्याने या देशाप्रती आपण दरवर्षी संकल्पबद्ध राहणे आपले प्रथम कर्तव्य आहे. ज्या भूमिवर आपण जन्म घेतो, जिच्यामुळे आयुष्यभर आपले पालनपोषण होते, त्या भूमिबद्दल इमान राखून आपली कर्तव्ये पार पाडण्याची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची असते. वर्षाच्या प्रथम दिनी ‘राष्ट्र प्रथम’ संकल्पबद्ध होऊया आणि वर्षभर त्याच्या पूर्णत्वासाठी कार्यरत राहूया. या देशात आपण प्रथम देशवासी म्हणून तसेच या देशाचे मतदार म्हणून देशाचे सार्वभौमत्व, अखंडत्व, एकात्मता आणि विकास याच्या रक्षणासाठी कटीबद्ध राहण्याची आवश्यकता आहे. आपली कोणतीच कृती हिंदु धर्माविरोधात असणार नाही, आपल्या राष्ट्राच्या विरोधात असणार नाही, याची काळजी वर्षभर घ्यायला हवी. आपण जशी देवभक्ती करतो, तशीच देशभक्तीही करायला हवी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी उत्कट देशभक्तीचा महिमा जगाला दाखवून दिला. “या देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो.” हे सावरकरांचे विचार प्रत्येक हिंदुने कायम ध्यानात ठेवल्यास त्याचे स्वत:चेही कल्याण होईल आणि भारतवर्षाचेही कल्याण होईल, याची जाणीव सावरकर यांनी करुन दिली आहे.

सावरकरांच्या या एका वाक्यात असलेला फार मोठा अर्थ आजच्या मंगलदिनी हिंदुंनी समजून घ्यायला हवा. देहाकडून देवाकडे जाताना म्हणजे आध्यात्मिक उन्नती प्राप्त करुन ईश्वरप्राप्तीकडे जाण्यापूर्वी आपली मातृभूमी (देश) व समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचे ऋण फेडायला हवे, कर्तव्यांचे पालन करायला हवे. म्हणजेच आजच्या घडीला देशासाठी आपल्याकडून जे थोडेकाही अपेक्षित आहे, ते आपण करायला पाहिजे. देशभक्तीसाठी सर्वांनाच सीमेवर लढण्याची वेळ राहिलेली नाही, हे भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे दाखवून दिले आहे. आपल्या अवतीभवती जर आपल्याला देशविरोधी हालचालींची पुसटशी जरी माहिती मिळाली तरी, ती आपल्या सुरक्षा यंत्रणेपर्यंत पोहोचविण्यातही देशभक्ती आहे. जे सैनिक बलिदान देतात, त्यांच्या कुटुंबाला हालाखिचे जीवन जगू लागू नये, यासाठी तत्पर राहून त्यांच्यासाठी कार्य करण्यात मोठी देशभक्ती आहे. आपल्या जन्मदिनी उगाच अनावश्यक उधळपट्टी करण्याऐवजी सैनिक कल्याणसाठी काहीतरी दान द्यावे. आपली मुले आईवडिलांवर, देशावर प्रेम करणारी होतील, असे संस्कार त्यांच्यावर करण्यात त्यांचे, कुटुंबाचे अन् देशाचेही भले आहे, आणि तीसुद्धा देशभक्तीच आहे. आपल्या ‘लोकशाहीची गीता’ म्हणजे संविधान अभ्यासून एक देशवासी म्हणून आपली भूमिका काय आहे? हे जाणून घ्यायला हवे. आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी जसे सैन्य हवे, तसेच चांगले राज्यकर्तेही आवश्यक आहेत, हे ध्यानी ठेवून मतदार म्हणून आपले कर्तव्य बजावण्यातही देशभक्ती आहे. आपण निवडून दिलेले सरकार जर योग्यप्रकारे राज्याचे, देशाचे कार्य करत नसेल, तर त्यांना सत्तेवरुन हटविण्यातही मोठी देशभक्ती आहे. आक्रमकांचा इतिहास लाथाडून आपल्या शूरवीरांचा, विरांगनांचा इतिहास आत्मसात करुन देशभक्तीचा जागर करता येतो. आपल्यासह देशाचा विचार करणे हे जबाबदार नागरिकत्वाचे उघड लक्षण आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक रात्रंदिवस राबतात ते स्वत: आमदार, खासदार, मंत्री होण्यासाठी नव्हेत, तर देश सांभाळण्यासाठी राष्ट्रवादी विचारांची माणसे घडविण्यासाठी! अशा संस्थांमधून जे कार्य होते, त्यातील देशभक्तीत तसूभरही कमतरता नसते. आपण हिंदु असल्याने आपल्या निसर्गात, सौरमंडळात एकूण पंचतत्वात देवत्व कसे ठासून भरलेले आहे, हे आपल्याला माहीत असले पाहिजे, ते माहीत असण्यातही देशभक्ती आहे. जलसंपदा, जंगलसंपदा, धान्यसंपदा, ज्ञानसंपदा यांचे रक्षण करण्यासाठी झटण्यातही देशभक्ती आहे. स्वत: घडणं आणि देशासाठी आहुती देणं ही फार मोठी देशभक्ती आहे.

गुढीपाडव्याच्या आजच्या मंगलदिनी राष्ट्राप्रती संकल्पबद्ध होताना आपण हिंदु म्हणूनही संकल्पबद्ध व्हायला हवे. हिंदु धर्माचे तत्वज्ञान समजून घेण्याचा संकल्प करुया. आपल्या प्रत्येक चालीरिती, सण, उत्सव, व्रतवैकल्ये, नामस्मरण, भजन, कीर्तन यामध्ये अध्यात्म आहे, शास्त्र आहे. शास्त्र म्हणजे विज्ञान आहे, हे अगोदर हिंदुंनी समजून घेतले, तर आपल्या धर्माविरुद्ध जी बदनामी केली जातेय ती चुकीची आहे हे आपल्या लक्षात येईल. ज्या काही गोष्टींना अंधश्रद्धा म्हटले जाते, त्यामागे असलेले विज्ञान समजून घेतले पाहिजे.

घर, समाज, मंदिर व अन्य ठिकाणी धर्म म्हणून आपली भूमिका काय असावी हे समजून घ्यायला हवे. मोठमोठे उत्सव साजरे करताना त्यामध्ये जर दहा मिनिटांचेही ध्यान नसेल, नामस्मरण नसेल तर आध्यात्मिक ऊर्जा, मन:शांती, चैतन्य कसे निर्माण होईल? आनंद व चैतन्य या दोन्हींमधील फरक ओळखता आला पाहिजे. यातील आपणस काय हवे? आनंद की चैतन्य? आनंद क्षणभंगूर, तर चैतन्य दीर्घकाळ आहे. काही गोष्टींतून आनंदच मिळतो, तर काहींतून आनंदाबरोबरच चैतन्यही प्राप्त होते. “गर्व से कहो हम हिंदू है।” म्हटले नाही तरी चालेल, “जय श्रीराम” म्हटले नाही तरी चालेल, पण अंतर्यामी हिंदुत्व मात्र असायलाच हवे. हिंदुत्व हेच भारतीयत्व ! भारतीयत्व हेच विश्वबंधुत्व! विश्वबंधुत्व हेच मनुष्यत्व ! मनुष्यत्व हेच सर्वश्रेष्ठत्व!

राजू भिकारो नाईक

Advertisement
Tags :

.