For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नववर्षाचा निश्चय

06:01 AM Jan 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
नववर्षाचा निश्चय
Advertisement

ऐहिक कामना पूर्ण व्हाव्यात, आयुष्यात स्थिरता व्हावी, यश मिळावे म्हणून विद्यार्थीदशेपासून माणूस दृढ निश्चय करतो. नव्या वर्षाचा पहिला दिवस हा त्याचा साक्षीदार असतो. वर्ष संपते. संकल्प विरून जातात. क्वचित उडूनही जातात. अध्यात्मवाटेवर चालताना साधकाच्या मनात रोज नव्या उर्मी उठतात. त्यांना प्रत्यक्षात आणण्यासाठी तो धडपडतो. मनापासून प्रयत्न करतो. पू. बाबा बेलसरे म्हणत, साधकाचे जे ध्येय असते त्याला अनुरूप असा निश्चय पाहिजे. नव्या वर्षाचा निश्चय म्हणजे पहिला निश्चय असा करावा की नामस्मरणाशिवाय राहायचे नाही.

Advertisement

खरे म्हणजे जगण्याचा प्रत्येक क्षण नवा असतो. शिक्षण देत असतो. आत्मभान जागृत करतो. सृष्टीमधला कण न् कण नव्याने फुलत असतो. पंचमहाभूते नवे विभ्रम दाखवीत साद घालत असतात. इतकेच कशाला, सभोवतीचा समाज, त्याचा स्वभाव हा प्रतीक्षणी बदलत असतो. नवाच असतो. बरेचदा आकलन होण्यापलीकडेही असतो. तरीही नित्यनेमाने नवीन वर्ष येऊ घातले की मनात नवे संकल्प स्फुरतात. नव्या वर्षाची ओढ नित्य सवयीच्या असलेल्या सांगता वर्षाला लागते. मनात नियोजनाची यादी तयार होते. काही संकल्प पूर्णत्वाला जातात तर काही अर्धवट राहतात. पुष्कळसे अव्यक्त राहून जातात. भविष्याची स्वप्नं बघावी, नवे ध्येय निर्माण करीत पुढे पुढे जावे हा प्रत्येकाचा ध्यास असतो. प्रकृतीधर्मानुसार व्यक्तीचे संकल्प निरनिराळे असतात. त्यात चांगले, वाईट हे ज्याच्या त्याच्या मनोविकासावर अवलंबून असते.

ऐहिक कामना पूर्ण व्हाव्यात, आयुष्यात स्थिरता व्हावी, यश मिळावे म्हणून विद्यार्थीदशेपासून माणूस दृढ निश्चय करतो. नव्या वर्षाचा पहिला दिवस हा त्याचा साक्षीदार असतो. वर्ष संपते. संकल्प विरून जातात. क्वचित उडूनही जातात. अध्यात्मवाटेवर चालताना साधकाच्या मनात रोज नव्या उर्मी उठतात. त्यांना प्रत्यक्षात आणण्यासाठी तो धडपडतो. मनापासून प्रयत्न करतो. पू. बाबा बेलसरे म्हणत, साधकाचे जे ध्येय असते त्याला अनुरूप असा निश्चय पाहिजे. नव्या वर्षाचा निश्चय म्हणजे पहिला निश्चय असा करावा की नामस्मरणाशिवाय राहायचे नाही. दिवस जर नामस्मरणाशिवाय गेला तर तो फुकट गेला असे वाटले पाहिजे. व्यापारी लोकांची जर एखाद्या दिवशी विक्री झाली नाही तर त्यांना तो दिवस वाया गेल्यासारखा वाटतो. त्यापेक्षाही जास्त साधकाला भगवंताचे नामस्मरण झाले नाही तर तो दिवस वाया गेला असे वाटले पाहिजे. नामस्मरण म्हणजे नेमके काय? हा प्रश्न अनेकांच्या मनात उभा राहतो. ओशो रजनीश म्हणतात, नामस्मरण हा यंत्रवत अभ्यास नको. नामाचा संबंध हा प्राणाशी आहे. संत मीराबाईंच्या श्वासाश्वासामध्ये भगवंत होता. ती म्हणते ‘म्हारो जनम मरन को साथी थाने नही बिसरू दिनराती.’ परमेश्वराची आठवण मीराबाईंच्या रोमारोमात अहर्निश वाहत राहते.

Advertisement

संत जनाबाईंचे अस्तित्व म्हणजे विठ्ठलनाम. म्हणूनच तर त्या म्हणतात, ‘देव खाते, देव पिते, देवावरी मी निजते’, एवढेच कशाला जो भेटतो तोही देवच असतो. जनाबाई, ‘देव देते, देव घेते आणि देवासवे व्यवहारिते.’ सगळीकडे तो देवच. ‘जनी म्हणे विठाबाई, भरूनि उरले अंतर्बाही.’ सतत स्मरण ही एक वृत्ती आहे. जनाबाई म्हणतात, हा नामाचा प्रसाद आहे. जो जनीला आनंद देणारा आहे.

संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, ‘जन विजन झाले आम्हा, विठ्ठलनामाप्रमाणे.’ महाराजांना जन आणि जनविरहित सर्वजण विठ्ठलनामाप्रमाणे झाले. सर्वसामान्यांच्या मनात अखंड स्मरण हे संसाराचे असते. ते माणूस प्रयत्न करूनही विसरत नाही. संसारस्मृती नष्ट होत नाही. त्यामुळे त्यातल्या सुखदु:खांपासून सुटका नाही. संतांच्या मनात बापमाय असतात ते विठ्ठल-रखुमाई. म्हणून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, वन असो वा ग्राम सर्व ठिकाणी आम्हाला पांडुरंग दिसतो. आम्ही ऐक्यभावाच्या आनंदात कौतुकाने नाचतो. त्यामुळे संसाराच्या सुखदु:खाची आठवण चित्ताला होतच नाही.

अध्यात्मपथाकडे वाटचाल करताना साधकाने केलेले संकल्प एका वर्षात पूर्ण होणारे नाहीत. त्यात जन्म निघून जाईल किंवा जन्मजन्मांतरी वाट बघावी लागेल. पूर्वसंचित आणि वर्तमान यांची गाठभेट घालून संतकृपा झाली तर पुढे पुढे जाता येते. पू. बाबा बेलसरे म्हणत की ज्ञानेश्वर महाराजांकडून ‘वाणीची तपश्चर्या’ शिका. हा एक नववर्षाचा संकल्प आहे. ज्ञानेश्वरीमध्ये एकही कडू शब्द नाही. कुणी दुखावेल, कुणाला बोचेल असे उद्गार नाहीत. माऊलींनीच म्हटले आहे, ‘तैसे साच आणि मवाळ, मितले परि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ, अमृताचे.’ सत्य, मृदू, थोडे, रसाळ आणि प्रेमाने भरलेले माऊलींचे शब्द आहेत. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणत, मी एकच व्रत केले-कोणाचेही अंत:करण दुखावले नाही. हा संकल्प सामान्य माणूस तर सोडाच साधकांसाठी तरी तडीस जाणार आहे का? उलटून बोलणे, प्रतिउत्तर देणे, फटकळपणा ही तर समाजातील काही लोकांची प्रतिष्ठाच असते. बोलण्यावर संयम आणि विवेक ही एक तपस्या आहे. मानवी शरीराला नऊ छिद्रे आहेत. त्यातून शरीरामधील नकोशी घाण बाहेर येते. शरीरातल्या मृत पेशी घाम व केसांद्वारे बाहेर येतात. फक्त मुख हे एक भाग्यवान आहे. त्यातून गोड बोलणे प्रकटते. भगवंताचे गोड नाम घेता येते. शब्दांमुळे कधी कधी माणसाचे आयुष्य बदलते, सावरते किंवा बिघडते. त्याचा कसा वापर करायचा हे माणसाच्या हाती आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, संत कसे बोलतात तर, ‘सहज बोलणे हितोपदेश । करुनी सायास शिकविती’ ।। जाणीवपूर्वक चांगले बोलणे हा एक उत्तम संकल्प आहे. माणसाचे खास वैशिष्ट्या म्हणजे बोलणे होय. मनुष्याच्या शरीरात सात चक्रं आहेत. त्यातील विशुद्ध चक्र हे कंठाजवळ आहे. उदानवायूच्या भ्रमणाचे स्थान असलेल्या या चक्राला सोळा पाकळ्या आहेत. माणूस जन्माला येण्यापूर्वी गर्भावस्थेमध्ये आणि जन्माला आल्यानंतर अर्भकावस्थेमध्ये स्वरयंत्र हे बरेच वर असते. सात ते आठ महिन्यानंतर ते खाली घसरू लागते आणि नंतर वाणीचा व्यापार सुरू होतो. बोलण्याची क्रिया ही उदान वायू करतो. मेंदूची वाढ आणि स्वरयंत्र खाली घसरणे या दोन क्रिया परस्परावलंबी आहेत असे जाणकार सांगतात.

माणसाचे बाळ बोलण्यापूर्वी स्वरांनी आपल्या भावना व्यक्त करू शकते. दोन महिन्यांचे एक बाळ एकदा मजेत आईचे स्तनपान करीत होते. शेजारी ठेवलेली एक वस्तू अकस्मात खाली पडली. तिचा आवाज झाला आणि दूध पिणे सोडून बाळ मोठ्याने रडू लागले. त्याची आई म्हणाली, ‘दूध पिताना आवाज झालेला बाळाला अजिबात आवडत नाही. त्याला राग येतो.’ अवघ्या दोन महिन्यात तिला बाळाचा स्वभाव कळला. याच क्रोधाचे जर पुढे पोषण झाले तर तो जीवनाच्या मध्यभागी विराजमान होतो आणि नंतर मग होते काय? तर, ‘जाली क्रोधाशी भेटी, तोंडावाटे नर्क लोटी’ अशी अवस्था होते. क्रोध जन्मापासून माणसाच्या संगतीत असतो. त्यावर मात करीत पुढे जाणे ही वाणीची तपश्चर्या आहे आणि ती कठीण आहे.

स्वामी विवेकानंद म्हणाले आहेत की माणसाच्या अंतरात जे परमात्मतत्त्व आहे, त्याचा विकास करणे आणि वाढ करायला संधी देणे हे शिक्षणाचे कार्य आहे. साधकावस्थेमध्ये हे स्वयंअध्ययन आहे. असे म्हणतात की मृत्यूच्या क्षणी माणसाला त्याच्या आयुष्याचा जीवनपट दिसतो. एक उजळणी होते. सरत्या वर्षाच्या सांगतेला देखील उजळणी होत असते. जगताना उजळणी ही आठवण बनते आणि सुखदु:खात मन असे काही गुरफटते की त्याचा गुंता सोडवता येत नाही. संतांच्या आठवणी म्हणजे त्यांच्या लिहिलेल्या लीला. त्या आतील सुधारणा घडवून आणतात. म्हणून सांगतेला अन् उगवतीला त्यांच्याच लीलांचे पारायण करावे आणि पुढे पुढे जावे.

-स्नेहा शिनखेडे

Advertisement
Tags :

.