‘सह्याद्रि’ची सभासदांना नववर्षाची भेट
मसूर :
राज्यात सह्याद्रि पॅटर्न म्हणून नावारुपास आलेला व विविध पुरस्कार प्राप्त करणारा सह्याद्रि सहकारी साखर कारखाना सुवर्ण महोत्सवी वर्षात एका वेगळ्या उंचीवर पोहोचला आहे. यावर्षीच्या गळीत हंगामाला येणाऱ्या उसाला जिह्यात सर्वाधिक दर देण्याबरोबरच सभासदांना मोफत घरपोच साखर देणार असल्याची घोषणा माजी सहकार मंत्री व कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी केली. सह्याद्रि कारखान्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातील या ऐतिहासिक निर्णयाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या तीन लाखावरील पहिल्या पाच पोत्यांच्या पूजनप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, कराड उत्तरचे अध्यक्ष देवराज पाटील, राज्य लेखा परिषदेचे माजी अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या संगीता साळुंखे, कारखान्याच्या उपाध्यक्षा लक्ष्मीताई गायकवाड, कराड मर्चंटचे चेअरमन माणिकराव पाटील, युवा नेते जशराज पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
उसाला पहिला हप्ता 3204 रूपये
माजी मंत्री बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले, सह्याद्रि कारखाना एक एप्रिल 2025 पासून सभासदांना मोफत घरपोच साखर देणार आहे. तसेच यावर्षी गळितास आलेल्या उसाला प्रति टन 3204 रुपयेप्रमाणे पहिला हप्ता ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर आजच जमा करण्यात आला असून उर्वरित 50 रुपयेच्या दरम्यान होणारी रक्कम नंतर देण्याचा निर्णय सर्व संचालक मंडळाने घेतला आहे.
राज्यात इतरत्र उसाचा गळीत हंगाम सुरू होत असताना ऊस दरासाठी आंदोलने केली जातात. मात्र सह्याद्रि कारखान्यावर ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांचा विश्वास असल्याने कारखान्याच्या कार्यक्षेत्रात कधीही ऊसदरासाठी आंदोलन होत नाही. यावर्षी आपला कारखाना आठ हजार मेट्रिक टनापेक्षा जास्त क्षमतेने सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तर प्रतिदिन नऊ हजार मेट्रिक टन उसाचे गळीत झाले आहे. यावर्षी नवीन प्लांटची ट्रायल शंभर टक्के पूर्ण होणार असून पुढच्या वर्षी दोन कारखाने व दोन डिस्टिलरी सुरू होणार आहेत. त्यामुळे पुढच्या वर्षीपासून प्रतिदिन अकरा हजार मेट्रिक टनापेक्षा जास्त क्षमतेने गळीत होईल. पुढील वर्षात सुमारे पंधरा लाख मॅट्रिक टन उसाचे गळीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच नवीन सभासद वाढवण्याचा निर्णयही यावेळी जाहीर करण्यात आला. कारखान्याकडे सध्या 60 हजार शेअर्स संख्या असून ती 75 हजारपर्यंत करण्यात येणार आहे. त्यासाठी सह्याद्रि कारखान्याकडे नियमित ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना सभासद करून घेण्यासाठी विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.
ते पुढे म्हणाले की, यावर्षी कारखान्याकडे 19 हजार 703 हेक्टर उसाची नोंद झाली असून त्यापैकी 2220 हेक्टर क्षेत्रावरील उसाचे गळीत पूर्ण झाले आहे सध्या सरासरी 11.50 साखर उतारा असून तो साधारणपणे साडेबारा होईल. सुवर्ण महोत्सवी वर्षापर्यंत सर्वसामान्य सभासद शेतकरी, ऊस उत्पादक, अधिकारी व कर्मचारी यांनी कारखान्याच्या प्रगतीसाठी भरीव सहकार्य केले आहे. यापुढेही असेच सहकार्य सर्वांनी करून अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.
प्रास्ताविक कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी केले. आभार माजी सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी मानले.
कार्यक्रमास कारखान्याचे संचालक सुरेश माने, संजय थोरात, अविनाश माने, लालासाहेब पाटील, पांडुरंग चव्हाण, शारदा पाटील आदींसह कारखान्याचे सर्व आजीमाजी संचालक, जिल्हा परिषद पंचायत समितीचे माजी सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सह्याद्रि पॅटर्न राज्यात अग्रेसर
अनेकदा साखर कारखान्यांच्या परिसरात गेल्यानंतर दुर्गंधी आणि प्रदूषणाचा त्रास सर्वसामान्यांना होत असतो, मात्र स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब यांच्या प्रेरणेतून आणि संस्थापक स्वर्गीय पी. डी. पाटीलसाहेब यांच्या दूरदृष्टीतून उभारलेला सह्याद्रि सहकारी साखर कारखाना पूर्णपणे दुर्गंधीमुक्त व प्रदूषणमुक्त म्हणून संपूर्ण राज्यात सह्याद्री पॅटर्न नावारूपाला आला आहे.
प्रशासकीय कामात अडचण येणार नाही
गेली पंचवीस वर्षे कराड उत्तरमधील जनतेने आपणाला लोकप्रतिनिधी म्हणून संधी दिल्याने राज्यातील सर्वच पक्षाचे राजकीय नेते व कार्यकर्ते यांच्याशी आपले जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे भविष्यात कोणत्याही प्रशासकीय कामात अडचणी येणार नाही, अशी ग्वाही बाळासाहेब पाटील यांनी यावेळी दिली.