न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे सर्वप्रथम स्वागत
ऑकलंडमध्ये मोठा जल्लोष : जोरदार आतषबाजीसह 2025 वर्षाला प्रारंभ
वृत्तसंस्था/ ऑकलंड
जगाच्या वेगवेगळ्या हिस्स्यांमध्ये टाइम झोन वेगळा असल्याने प्रत्येक देशाचे नववर्ष वेगवेगळ्या वेळेत सुरू होते. याचमुळे सर्वप्रथम किरीटीमाटी बेटावर (ख्रिसमस बेट) नववर्ष साजरे करण्यात आले आहे. हे बेट किरिबाती रिपब्लिकचा हिस्सा आहे. तेथील प्रमाणवेळ भारतापेक्षा 7.3 तासांनी पुढे आहे. भारतापूर्वी एकूण 41 देशांनी नववर्षाचे स्वागत केले आहे. न्यूझीलंडच्या नागरिकांनी देखील 2025 या वर्षाचे जोरदार स्वागत केले आहे. याचबरोबर जगातील अन्य हिस्स्यांमध्ये नववर्षाच्या प्रारंभी लोकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला आहे.
टाईम झोननुसार किरीटीमाटी बेट आणि न्यूझीलंडमध्ये सर्वप्रथम नववर्ष सुरू झाले आहे. किरीटीमाटीमध्ये नववर्षाच्या आगमनाच्या काही मिनिटातच न्यूझीलंडच्या टोंगा आणि चॅथम बेटावर नववर्षाचे स्वागत करण्यात आले आहे. तर सर्वात अखेरीस नववर्षाचे स्वागत दक्षिण प्रशांतमधील अमेरिकन समोआ आणि नीयू बेटावर केले जाते.
भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3.30 वाजताच किरीटीमाटी येथे नववर्षाचा प्रारंभ झाला आहे. हे बेट प्रशांत महासागरात आहे. भारतात जेव्हा दुपारचे 3.30 वाजतात तेव्हा किरीटीमाटीमध्ये रात्रीचे 12 वाजलेले असतात. न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये आतषबाजीसह नववर्षाचे स्वागत करण्यात आले आहे. ऑकलंडच्या प्रसिद्ध क्लॉक टॉवर प्रकाशाने उजळलेले दिसून आलेले आहे. भारतात दुपारचे 3.45 वाजले असताना न्यूझीलंडच्या चॅथम बेटावर नववर्ष सुरू झाले आहे. तर ऑकलंड आणि वेलिंगटनमध्ये भारतात दुपारचे 4.30 वाजले असताना नववर्षाला प्रारंभ झाला. ऑस्ट्रेलियातही आतषबाजीद्वारे नववर्षाचे स्वागत करण्यात आले आहे. नववर्षाच्या स्वागताकरता तेथील लोकांनी महत्त्वाच्या चौकांमध्ये गर्दी केली होती.