नववर्षात ग्राहकांना बसणार वीज दरवाढीचा ‘शॉक’
केईआरसीचा प्रस्ताव : टॉप अप नावाने प्रतियुनिट 10 पैसे वाढ शक्य
प्रतिनिधी/ बेंगळूर
नव्या वर्षात राज्यातील जनतेला वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे. कर्नाटक वीज नियंत्रण आयोगाने (केईआरसी) राज्यात वीज दरात प्रतियुनिट 10 पैसे वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. केईआरसीने टॉप अप किंवा ट्रू-अप नावाने प्रतियुनिट वीजदर 8 ते 10 पैसे वाढ करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, वीज दरवाढ असा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे नववर्षात ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत. सदर प्रस्तावावर जनतेची मते मागविल्यानंतर केईआरसी निर्णय घेणार आहे.
मार्च महिन्यात केईआरसीने वीजदरवाढ करताना पुढील तीन वर्षे दरवाढ स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. पण, बाजारपेठेतील चढ-उतार आणि वीज पुरवठा कंपन्यांची आर्थिक स्थिती विचारात घेऊन काहीसा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व एस्कॉमच्या कार्यक्षेत्रात टॉप अप दर समान लागू असेल. प्रतियुनिट 8 ते 10 पैसे दरवाढ होण्याची शक्यता असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
दगडी कोळशाच्या दरातील स्थिरता आणि पुनर्निर्मितीक्षम ऊर्जेवर भर दिल्याने उत्पादन खर्च कमी झाला आहे, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु, गृहज्योती योजनेंतर्गत मोफत वीज पुरविली जात असल्याने दरकपात करणे शक्य नाही. खर्चाचा भार ग्राहकांवर टाकण्यासाठी टॉप अप आवश्यक असल्याचे केईआरसीचा दृष्टीकोन आहे.