जर्मनीच्या मार्टीन्सचा नवा विश्वविक्रम
वृत्तसंस्था/ स्टॉकहोम
जर्मनीचा ऑलिम्पिक चॅम्पियन जलतरणपटू लुकास मार्टीन्सने पुरुषांच्या 400 मी. फ्री स्टाईल जलतरण प्रकारात नवा विश्वविक्रम नोंदविला. येथे झालेल्या खुल्या स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत मार्टीन्सने ही महत्त्वाची कामगिरी केली.
पुरुषांच्या 400 मी. फ्रीस्टाईल जलतरण प्रकारात जर्मनीचा मार्टीन्स याने 3 मिनिटे 39.96 सेकंदाचा अवधी घेत नवा विश्वविक्रम नोंदविताना 2009 साली जर्मनीच्या पॉल बिडेरमनने नोंदविलेला या क्रीडा प्रकारातील विश्वविक्रम 0.11 सेकंदाने मोडीत काढला. या क्रीडा प्रकारात 3 मिनिटे 40 सेकंदांपेक्षा कमी कालावधी नोंदविणारा मार्टीन्स हा पहिला जागतिक जलतरणपटू ठरला आहे. 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत 23 वर्षीय मार्टीन्सने पुरुषांच्या 400 मी. फ्रीस्टाईल जलतरण प्रकारात सुवर्ण पदक पटकाविताना 3 मिनिटे 41.78 सेकंदाचा अवधी घेतला होता.