'मिऱ्या-नागपूर'ची ९२ कोटींची नवी कामे तर २०० कोटींचा 'फ्लायओव्हर'
रत्नागिरी :
रत्नागिरीतील मिऱ्या-नागपूर महामार्गाची मूळ निविदा ८६८ कोटी रुपयांची असताना आता या कामात नवीन ९२ कोटी रुपयांच्या कामांची भर पडली आहे. त्यातच कुवारबाव येथील रद्द करण्यात आलेल्या 'फ्लायओव्हर'चा सुमारे सव्वा कि.मी.चा २०० कोटींचा डीपीआर पुन्हा तयार केला जात आहे. रत्नागिरी ते आंबा घाट या सुमारे ५६ किलोमीटर लांबीच्या टप्याचे काम अजूनही अपूर्ण असून शासनाने ठेकेदार कंपनीला मार्च २०२६ पर्यंत पुन्हा मुदतवाढ दिली आहे.
गेल्या २ वर्षांपासून सुरू असलेल्या मिऱ्या-कोल्हापूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला अपेक्षित गती मिळत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कामातील विलंब आणि वाढीव खर्चामुळे हा महामार्ग आता आणखीनच चर्चेत आला आहे. ठेकेदार कंपनीकडून ५६ पैकी ४४ किलोमीटरचा रस्ता दोन्ही बाजूंनी पूर्ण झाला आहे. सुरुवातीला या टप्प्याची निविदा ९३० कोटींची होती, जी नंतर वाहतुकीच्या कमी प्रमाणामुळे ८६७ कोटी रुपयांपर्यंत कमी करण्यात आली. मात्र २ वर्षे उलटूनही काम पूर्ण झालेले नाही. आता या कामामध्ये ९२ कोटी रुपयांची नवीन कामे प्रस्तावित आहेत. त्यामुळे ही कामे मूळ निविदेत का समाविष्ट केली नाहीत, असा सवाल स्थानिक नागरिकांतून व्यक्त होत आहे.
- कुवारबावमध्ये २०० कोटींचा नवा उड्डाणपूल
या सर्व कामांव्यतिरिक्त ठेकेदार कंपनीने कुवारबाव येथे सुमारे २०० कोटी रुपये खर्चुन उड्डाणपूल (फ्लायओव्हर) बांधण्याचा नवा प्रस्ताव तयार केला आहे. या पुलाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे महामार्गाच्या कामाचा एकूण खर्च मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
- मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या नवीन कामांचे टप्पेः
आताच्या ९२ कोटी रुपयांच्या नवीन कामांची तीन टप्प्यांमधील विभागणीः
▶ पहिला टप्पा (४५ कोटी): यात कुवारबाव येथील तीन पदरी सर्व्हिस रोड, नाणीज येथील ९ मीटर सर्व्हिस रोड आणि साखरपा येथील अंडरपासचा समावेश आहे.
▶ दुसरा टप्पा (११.७१ कोटी): यात महावितरणचे पोल, ट्रान्सफॉर्मर, एमआयडीसी आणि जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा पाईपलाईनचे स्थलांतरण केले जाईल.
▶ तिसरा टप्पा (३०.०३ कोटी): या टप्प्यात स्टेट बँक कॉलनी, गणेश कॉलनी, टीआरपी, कुवारबाव, महालक्ष्मी मंदिर (खेडशी) आणि दख्खन (साखरपा) येथे रस्ता ओलांडण्यासाठी बॉक्स टाकले जातील.
▶ या व्यतिरिक्त कारवांचीवाडी, खेडशी शाळा, करंजारी व साखरपा वाणीआळी येथे फूट ओव्हरब्रिज बांधले जाणार आहेत आणि साळवी स्टॉप येथील पालिकेची पाईपलाईन स्थलांतरित करण्यासाठी ४.६८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. ६४ ठिकाणी जोडरस्त्यांचाही प्रस्ताव केंद्राकडे सादर.