हवाई दलाच्या ताफ्यात लवकरच नवी ‘तेजस’
एचएएल’ची माहिती : तांत्रिक समस्या दूर
► वृत्तसंस्था/ बेंगळूर
तेजस लढाऊ विमानांच्या पुरवठ्याबाबत हवाई दल प्रमुखांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेडने (एचएएल) बुधवारी प्रतिक्रिया दिली. आम्ही लवकरच हवाई दलाला नवी ‘तेजस’ विमाने देण्यास सुरुवात करू, असे एचएएलने म्हटले आहे. डिलिव्हरीमध्ये झालेल्या विलंबासाठी एचएएल कंपनीला जबाबदार धरले जात होते, परंतु हा विलंब तांत्रिक बिघाडामुळे झाला आहे. आता तांत्रिक दोष दूर करण्यात आले आहेत, असे एचएएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डी. के. सुनील यांनी स्पष्ट केले. ‘एचएएल’चे हे स्पष्टीकरण बेंगळूर एअर शो दरम्यान हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी तेजसच्या वितरणाबद्दल चिंता व्यक्त केल्यामुळे आले आहे.
हवाई दलाला अद्याप 40 लढाऊ विमाने मिळालेली नाहीत. हवाई दल प्रमुख 10 फेब्रुवारी रोजी बेंगळूर एअरो इंडिया शोमध्ये पोहोचले. यादरम्यान एका व्हिडिओमध्ये, एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग एचएएल अधिकाऱ्यांशी झालेल्या संभाषणादरम्यान आपली नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये ए. पी. सिंग यांनी एचएएलला हवाई दलाच्या चिंता दूर करण्यास आणि त्यांची विश्वासार्हता वाढविण्यास सांगितले. सदर व्हिडिओमध्ये ते तुम्हाला आमच्या चिंता दूर कराव्या लागतील आणि आम्हाला अधिक आत्मविश्वास द्यावा लागेल, असे बोलताना दिसत आहेत.