नवीन संघ....
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी जाहीर केलेली नवी राष्ट्रीय कार्यकारिणी अनेकार्थांनी महत्त्वपूर्ण ठरते. आगामी विधानसभा निवडणुका तसेच 2029 ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन या कार्यकारिणीत नव्या-जुन्यांना स्थान दिल्याचे दिसून येते. त्याचबरोबर या नियुक्त्यांना जंतर-मंतरवरील आंदोलनाची किनार असल्याचेही पहायला मिळते.
देशात 2014 पासून भाजपाची निर्विवाद सत्ता आहे. अर्ध्या अधिक भारतातही भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारे आहेत. पक्षविस्तार व प्रभाव वाढत असला, तरी मागच्या काही दिवसांमध्ये भाजपाला मोठे धक्के बसले आहेत. यातला सर्वांत जिव्हारी बसलेला धक्का म्हणजे जंतर-मंतर आंदोलनाचा. नीट पेपरफुटीप्रश्नी विद्यार्थ्यांनी छेडलेल्या या आंदोलनामुळे मागच्या बारा वर्षांत प्रथमच भाजपाला माघार घ्यावी लागली. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देणे भाग पडले. यापासून धडा घेत भाजपाने आपल्या रणनीतीत बदल केल्याचे दिसून येते. कार्यकारिणीतील जुन्या व नव्या नेत्यांचा मेळ बरेच काही सांगतो. यामध्ये 40 वर्षांखालील सहा, 40 ते 59 गटातील 15 जण, 59 वर्षांवरील 44 जणांसह 12 महिला नेत्यांचाही समावेश असून, याद्वारे अनुभवी व नव्या पिढीचा मिलाफ साधण्यात आल्याचे पहायला मिळते. यातून तरुण पिढी व महिलांवर पक्षाचा फोकस असल्याचे अधोरेखित होते. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्मृती इराणी विजनवासात होत्या. त्याचबरोबर वसुंधराराजे शिंदे याही फारशा प्रकाशात नव्हत्या. परंतु नव्या कार्यकारिणीत या दोन्ही नेत्यांसह डॉ. भारती पवार यांनाही स्थान देण्यात आले आहे. इराणी हा आक्रमक चेहरा. तर वसुंधराराजे या अनुभवसिद्ध राजकारणी. भाजपच्या आत्तापर्यंतच्या विजयातील महिलांचा वाटा लक्षात घेऊन महिलांना प्राधान्याने संधी देण्यात आली आहे. 2027 मध्ये उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा, मणिपूर, हिमाचल प्रदेश आणि गुजरात या सात राज्यांमध्ये निवडणूक होत आहे. तर 2029 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील. या निवडणुकांमध्ये भाजपसमोर काँग्रेसचे कडवे आव्हान उभे राहण्याची चिन्हे आहेत. हे ध्यानात घेऊन कार्यकारिणीत विनोद तावडे यांच्यासारख्या मुरलेल्या नेत्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तावडे हे तर सर्वांत ज्येष्ठ राष्ट्रीय सरचिटणीस ठरले आहेत. राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपासून अगदी बिहारच्या निवडणुकीपर्यंतच्या प्रत्येक राजकीय रणनीतीत विनोद तावडे यांचा मुख्य रोल राहिला आहे. देशव्यापी मोहिमांचे समन्वयक, निवडणूक प्रभारी, रणनीतीकार, समन्वयक अशा सगळ्याच भूमिका विनोद तावडे यांनी नेटाने पार पाडलेल्या दिसतात. त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर पुन्हा विश्वास टाकला आहे. स्वाभाविकच भाजपची घोडदौड सुरू ठेवण्याकरिता विनोद तावडे यांना आगामी काळातही महत्त्वाची जबाबदारी पार पाडावी लागेल. केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे परत एकदा कोषाध्यक्षपद आले असून, संघटनात्मक रचनेतील हा महत्त्वाचा भाग म्हणता येईल. आता खांदेपालटात त्यांच्याकडील मंत्रिपद कायम राहणार की केवळ संघटनात्मक जबाबदारीच असेल, हे पहावे लागेल. राम माधव यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या नाराजीचा फटका बसला होता. त्यांचे पुनरागमन हा संघटनात्मक कोर्स करेक्शनचा भाग मानला जातो. उत्तर प्रदेशात हरीश द्विवेदी यांना स्थान देऊन उच्चवर्णीय मतदारांना चुचकारण्याची भूमिका घेण्यात आल्याचे दिसते. या नियुक्त्यांवरील पंजाब निवडणुकीचा प्रभावही लपून राहत नाही. केजरीवाल यांचे निकटवर्ती संदीप पाठक यांचा टीममध्ये झालेला समावेश पुरेसा बोलका. विद्यार्थी आंदोलन व सोशल माध्यमांवरील बदलते राजकीय वातावरण याचा अंदाज घेण्यात भाजपच्या आयटी सेलला अपयश आले होते. हे बघता अमित मालवीय यांची प्रमुखपदावरून झालेली उचलबांगडी अपेक्षितच. त्यांच्या जागी आलेल्या छत्तीसगडच्या दीपक म्हस्के यांच्यापुढे जेन झींचे आव्हान असेल. एकूणच भाजपचा नवा संघ समतोलच म्हणता येईल.