लोहार-सुतार समाजाच्या चळवळीला नवे बळ; जिल्हास्तरीय कोअर कमिटीची घोषणा, बाळासाहेब लोहार अध्यक्षपदी
सातारा, लोहार–सुतार समाज, कोअर कमिटी स्थापन
सातारा - सातारा जिल्ह्यात लोहार–सुतार समाजाच्या संघटनात्मक बळकटीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. समाजाला एकत्र आणत ‘कोअर कमिटी’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे समाजाच्या चळवळीला नवे बळ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या बैठकीची सुरुवात विश्वकर्मा प्रतिमा पूजन आणि महाराष्ट्र गीताने करण्यात आली. प्रास्ताविक करताना ऍडव्होकेट गणेश लोहार यांनी जिल्ह्यातील ११ तालुक्यांमधील समाजाची ताकद अधोरेखित करत, समन्वयाच्या अभावामुळे अपेक्षित प्रगती होत नसल्याची खंत व्यक्त केली. समाजहितासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
दरम्यान, कोअर कमिटीची प्राथमिक रचना जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी बाळासाहेब लोहार, तर उपाध्यक्षपदी अनिल लोहार, निर्मला दुधाणे आणि संभाजी सुतार यांची निवड करण्यात आली. सचिवपदी संतोष शिराळे, सहसचिव महेंद्र कदम तर खजिनदारपदी राजेंद्र लोहार आणि कुमार लोहार यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी उपाध्यक्ष अनिल लोहार यांनी समाजासाठी ५ टक्के आरक्षणाची मागणी करत, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन उभारण्याचे आवाहन केले. तसेच समाजातील तरुण पिढीला पुढे आणून संघटनात्मक एकता मजबूत करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.