नवा तारा...
बांगलादेशातील सर्वात्रिक निवडणुकीत बांगलादेश नॅशनालिस्ट पार्टी अर्थात बीएनपीला मिळालेले निर्भेळ यश हे ऐतिहासिकच म्हटले पाहिजे. माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र आणि पक्षाचे अध्यक्ष तारिक रेहमान यांच्या नेतृत्वाखाली बीएनपीने 299 पैकी तब्बल 209 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे बांगलादेशमध्ये स्थिरता निर्माण होण्याच्या आशा आता बळावल्या दिसतात. ऑगस्ट 2024 मध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील सरकार विद्यार्थी संघटनांनी उलथवून टाकल्याने बांगलादेशात अस्थिर परिस्थिती तयार झाली होती. त्यानंतर शेख हसीना भारतात आश्रयासाठी आल्या व हंगामी पंतप्रधान म्हणून नोबेल पारितोषिक विजेते महंमद युनूस यांची नियुक्ती करण्यात आली. या पार्श्वभूमीवर दीड वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. 12 कोटीच्या आसपास मतदार असलेल्या या देशात 47 ते 50 टक्क्यांवर मतदानाची नोंद झाली होती. बहुमतासाठी 150 जागा अपेक्षित असताना प्रत्यक्षात निकालामध्ये मतदारांनी बीएनपीला स्पष्ट कौल दिल्याचे दिसून येते. दुसऱ्या बाजूला मुख्य प्रतिस्पर्धी जमात-ए-इस्लामीच्या नेतृत्वाखालील 11 पक्षाच्या आघाडीने 70 जागा पटकावल्या आहेत. शेख हसीना यांचा अवामी लीग पक्ष मात्र या निवडणुकीत सहभागी नव्हता. त्यांची मतेही प्रामुख्याने बीएनपीकडे वळलेली दिसतात. 1991 ते 2024 या काळात बांगलादेशच्या राजकारणावर खालिदा झिया आणि शेख हसीना या दोघींचे वर्चस्व राहिले. दोन्ही पक्ष आलटून पालटून काही काळ सत्तेवर असत. किंबहुना 2008 ते 2004 या काळात शेख हसीना यांचा अवामी लीग सत्तेत होता. परंतु, बांगलादेश परिवर्तनावर स्वार झाल्याने या देशाच्या राजकारणात नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. खरे तर जमात ए इस्लाम हा पक्ष टोकाचे व धर्मांध राजकारण करण्यासाठी प्रसिद्ध आहे. या पक्षाचा बांगलादेशातील स्वातंत्र्ययुद्धालाही विरोध होता. या पक्षाने कायम धर्मांध राजकारण केले. त्याचा या देशातील हिंदू बांधवांनाही कायम फटका बसला. मात्र, येथील जनतेने धर्मांध व कट्टरतावादी राजकारण पूर्णपणे नाकारल्याचे या निकालातून अधोरेखित होते. यातून या देशातील सर्वच पक्षांनी धडा घेतला पाहिजे. अर्थात बीएनपीचे नेते तारिक रहमान यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील. माजी राष्ट्रपती झियाउर रहमान आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे तारिक हे पुत्र. शेख हसीना यांच्या सत्ताकाळात 2008 मध्ये त्यांना देश सोडून पळून जावे लागले. शेख हसीना सरकारने त्यांच्याविऊद्ध 80 हून अधिक खटले दाखल केले होते. त्यांना 17 वर्षांच्या तुऊंगवासासह विविध प्रकरणांमध्ये जन्मठेपेची शिक्षाही सुनावण्यात आली होती. त्यानंतर रहमान हे लंडनमधून पक्षाचे कामकाज सांभाळत राहिले. 2018 पासून पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून ते काम पहायचे. जवळजवळ 17 वर्षे निर्वासित राहिल्यानंतर 25 डिसेंबर 2025 रोजी लंडनहून बांगलादेशला ते परतले. त्यानंतर एखाद्या नायकासारखे त्यांचे झालेले स्वागत, ढाक्मयाला मातीला स्पर्श करून त्यांनी केलेले अभिवादन यातून त्यांची वेगळी प्रतिमा तयार झाली. यानंतर काहीच दिवसांत म्हणजेच 30 डिसेंबर 2025 रोजी खालिदा झिया यांचे निधन झाले व पक्षाच्या अध्यक्षपदाची कमानही त्यांच्याकडे आली. अध्यक्षपदावर विराजमान झालेल्या रहमान यांनी पक्षामध्ये नवी ऊर्जा पेरतानाच लोकांना विश्वास देण्याचे काम केले. संपूर्ण देशाचा दौरा करत लोकांशी थेट संवाद साधला. देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी नवा रोडमॅप सादर केला. त्याचेच त्यांना फळ मिळालेले दिसते. शिक्षण, दारिद्र्या, बेरोजगारी हे या देशातील महत्त्वाचे प्रश्न आहेत. रहमान यांनी या प्रश्नांना हात घालतानाच राष्ट्रवाद, आर्थिक पुनर्बांधणी, संस्थात्मक सुधारणांचा मुद्दा पुढे केला. त्यामुळे त्यांना झेन जीसह सर्वच वयोगटातील लोकांचा पाठिंबा मिळाला, असे दिसून येते. खालिदा झिया यांना मानणाराही बांगलादेशात एक मोठा वर्ग आहे. त्यांच्या निधनामुळेही निर्माण झालेल्या सहानुभूतीचाही बीएनपीला लाभ झालेला पहायला मिळतो. अवामी लीगने निवडणूक न लढवण्याचा निर्णयही बीएनपीच्या पथ्यावर पडला. शेख हसीना यांना एकतर तरुणाईच्या असंतोषाचे धनी व्हावे लागले. त्यात त्यांच्या पक्षावरही बंदी आली. स्वाभाविकच ही जागा बीएनपीने भरून काढली. जमातकडे धर्मांधतेशिवाय कोणतेही मॉडेल नव्हते. त्याऐवजी आपल्या भवितव्यासाठी तसेच स्थैर्य आणि स्वाभिमानासाठी बीएनपी हाच मजबूत पर्याय आहे, अशी लोकभावना तयार झाली व त्यातूनच रहमान यांच्या पक्षाला इतके उत्तुंग यश मिळाले, असे म्हणता येईल. तारिक यांच्या रुपाने बांगलादेशला नवा तारा मिळाला असला, तरी रहमान सरकार भारतासाठी सकारात्मक ठरणार की नकारात्मक, याचे उत्तर शोधण्यासाठी काही काळ वाट पहावी लागेल. हसीना सरकारच्या काळात भारताचे बांगलादेशशी अत्यंत जवळचे संबंध होते. व्यापार, पायाभूत सुविधा, दहशतवादविरोधी समन्वय या आघाड्यांवर परस्पर सहकार्यवादी दृष्टीकोन बघायला मिळाला. मात्र, हसीना यांना भारताने दिलेला आश्रय नवे सरकार आणि आपल्यातील संवादामधील अडसर ठरू शकतो का, हे बघावे लागेल. अलीकडच्या काळात चीन व पाकिस्तानसारख्या देशांची बांगलादेशसोबत जवळीक वाढत आहे. हे बघता नक्कीच आपल्यासमोर काही आव्हाने उभी राहू शकतात. तथापि, दोन देशांतील संबंध सुधारण्यावर आपण भर द्यायला हवा. त्यासाठी आपल्याला योग्य ती रणनीती आखावीच लागेल. मागच्या काही वर्षांत अनेक शेजारी राष्ट्रांसोबतचे आपले संबंध बिघडले आहेत. असे होऊ नये, याची दक्षता आपण घ्यायला हवी. बांगलादेशात हिंदूंची संख्याही मोठी असून, या मतदाराने बीएनपीची पाठराखण केल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर बीएनपी व पक्षाचे नेतृत्व तारिक रहमान यांच्याशी आपल्याला नव्याने संबंध प्रस्थापित करावे लागतील. तसे होणे दोन्ही देशांसाठी निश्चितच लाभदायक असेल.
