अनेक वर्षांची प्रवाशांची मागणी पूर्ण; वेंगुर्ले-तुळस-सावंतवाडा-अणसुर मार्गे सावंतवाडीसाठी एसटी बससेवा सुरू
वेंगुर्ला : तुळस, सावंतवाडा आणि अणसुर परिसरातील प्रवाशांची अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. वेंगुर्ले-अणसुर-मडकेलवाडी-सावंतवाडा-जकातनाका मार्गे सावंतवाडी ही नवीन एसटी बससेवा 1 सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली. या बससेवेमुळे या भागातील प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होणार असून, प्रवाशांनी एसटी विभागाच्या निर्णयाचे समाधान व्यक्त केले आहे.
या बससेवेचा शुभारंभ माजी सभापती जयप्रकाश चमणकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
ही बससेवा सुरू करण्यासाठी माजी सभापती जयप्रकाश चमणकर, तुळस-सावंतवाडा येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष सावंत, रामचंद्र सावंत, अरुण सावंत, पंचायत समिती सभापती शंकर घारे, जिल्हा परिषद सदस्या सुजाता पडवळ, तुळस ग्रामपंचायत, किरण ठोंबरे, मुंबई मंडळ, गाव मंडळ तसेच उत्कर्ष मंडळ यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
प्रवाशांना मोठा दिलासा
वेंगुर्ला आणि सावंतवाडी दरम्यान प्रवास करणाऱ्या तुळस, अणसुर आणि परिसरातील नागरिकांना यापूर्वी प्रवासासाठी विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. नवीन बससेवेमुळे या भागातील विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी तसेच सर्वसामान्य प्रवाशांना सावंतवाडीला जाणे अधिक सोयीचे होणार आहे.
बससेवेच्या शुभारंभप्रसंगी सुभाष सावंत, अरुण सावंत, किशोर सावंत, रामचंद्र सावंत, यशवंत सावंत, बाबाजी सावंत, अक्षता सावंत, विजय सावंत, किरण ठोंबरे, नेत्रा सावंत, विद्या आंगचेकर, जागृती सावंत, सोनिया सावंत, आनंदी सावंत, चंद्रकला सावंत, सुखांती सावंत आणि दिव्या सावंत यांच्यासह अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाल्याने या परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत बससेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.