यंदाच्या हंगामातील नवीन जवारी बटाटा एपीएमसीमध्ये दाखल
बटाटा पिशव्यांना हार घालून श्रीफळ वाढवून केले पूजन
वार्ताहर/अगसगे
बेळगाव तालुक्यातील यंदाच्या हंगामातील नवीन जवारी बटाटा आवक बुधवार दि. 21 रोजी एपीएमसी मार्केटयार्डमधील श्री गणेश ट्रेडर्स दुकानांमध्ये विक्रीसाठी दाखल झाला होता. गणेश चतुर्थीनंतर बटाटा काढणीला मोठ्या प्रमाणात प्रारंभ होणार आहे. तालुक्यातील भुतरामहट्टी गावातील शेतकरी मल्लापा ईराप्पा कांबळे यांनी आपल्या शेतातील 16 पिशव्या बटाटा काढून बुधवारी श्री गणेश ट्रेडर्स दुकानामध्ये विक्रीसाठी आणला होता. स्थानिक खरेदी दराने हा बटाटा खरेदी केला आहे. गोळी बटाटा 1500 रुपये क्विंटल, मीडीयम बटाटा 2500 रुपये व गोळा बटाटा 3150 रुपये भावाने विक्री झाली. भुतरामहट्टी परिसरात सर्वप्रथम बटाटा लागवड केली जाते. अवकाळी पावसाला प्रारंभ होताच येथील शेतकरी मार्केटयार्डमधून बियाणांची खरेदी करून बटाटा लागवड करतात. त्यामुळे पीकही लवकर मिळते. सध्या इथून पुढे हळूहळू थोड्या थोड्या प्रमाणात बटाटा मार्केटयार्डमध्ये विक्रीसाठी दाखल होतो. बेळगाव तालुक्यातील आणि खानापूर तालुक्यातील जवारी बटाटा काढणीला गणेश चतुर्थीनंतर प्रारंभ होतो.
सध्या लाल जमीन आणि मसार जमिनीतील बटाटा काढणीला सुऊवात झाली आहे. या बटाट्याला परराज्यातील दिल्ली, मुंबई, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, पुणे, आंध्र प्रदेश, बेंगळूर आदी ठिकाणी मागणी असते. हा बटाटा खरेदी करण्यासाठी परराज्यातील खरेदीदार दोन महिने बेळगावमध्ये ठाण मांडून असतात. कारण हा बटाटा खाण्यासाठी चवदार असतो व या बटाट्याचे चिप्सदेखील बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. यंदा मागील वर्षापेक्षा थोड्या जास्त प्रमाणात बटाटा लागवड करण्यात आली आहे. मात्र अती पाऊस झाल्याने उत्पादनात घट निर्माण होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच करपा रोगदेखील पडला आहे. यंदाच्या हंगामातील प्रथमच 16 पिशव्या जवारी बटाटा विक्रीसाठी मार्केटयार्डमधील अडत व्यापारी राजू जाधव यांच्या श्री गणेश ट्रेडर्स दुकानांमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे प्रथम त्यांनी बटाटा पिशव्यांना हार घालून श्रीफळ वाढवून पूजन केले. यावेळी शेतकरी मल्लाप्पा कांबळे यांचे कौतुक करण्यात आले.