For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ईशान्य भारतात नवी प्रादेशिक युती

06:06 AM Nov 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
ईशान्य भारतात नवी प्रादेशिक युती
Advertisement

कोनराड संगमा, प्रद्योत माणिक्य यांचा पुढाकार

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

ईशान्य भारतातील काही प्रादेशिक पक्षांनी एकत्र येत नवी राजकीय युती स्थापन केली आहे. याकामी मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा, तिप्रा मोथा या पक्षाचे नेते प्रद्योत माणिक्य आणि भारतीय जनता पक्षाचे माजी प्रवक्ते एम. किकोन यांनी पुढाकार घेतला आहे. संगमा यांचा एनपीपी आणि माणिक्य यांचा तिप्रा मोथा हे दोन्ही पक्ष सध्या भारतीय जनता पक्षाचे सहकारी पक्ष आहेत.

Advertisement

ईशान्य भारताची वेगळी राजकीय ओळख संवर्धित करण्यासाठी आम्ही एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एका समितीची स्थापना केली असून ही समिती ईशान्य भारतासंबंधीचा अहवाल येत्या 45 दिवसांमध्ये सादर करणार आहे. आमचा उद्देश कोणत्याही राजकीय पक्षाशी लढण्याचा नाही. ईशान्य भारताच्या लोकांचा विकास हेच आमचे ध्येय आहे. या युतीचे ध्येय ईशान्य भारतातील लोकांना एक व्यासपीठ मिळवून देणे, हेच आहे, असे स्पष्टीकरण कोनराड संगमा यांनी युतीची स्थापना झाल्यानंतर पत्रकार परिषदेत केले आहे.

इतर पक्षांशी संपर्क साधणार

स्थापन करण्यात आलेल्या समितीला इतर राजकीय पक्षांशी संपर्क प्रस्थापित करण्याची सूचना करण्यात आली आहे. भविष्यात या वैचारिक युतीचा विस्तार करण्याची योजना आहे. त्यामुळे ईशान्य भारतातील अन्य राजकीय पक्षांशी चर्चा केली जाणार आहे. ईशान्य भारतातील मूळ निवासींच्या भूमीचे संरक्षण कसे होणार, हा एक चिंतेचा विषय असून तो आमच्यासमोरचा मुख्य प्रश्न आहे. ईशान्येतील प्रादेशिक राजकीय पक्ष योग्यवेळी एकत्र येऊन स्वत:चा विलय एका राजकीय पक्षात  करणार आहेत, अशी माहितीही कोनराड संगमा यांनी यावेळी दिली.

स्थानिक जनतेच्या हितासाठीच...

आमचा हा प्रयत्न स्थानिक जनतेच्या हितासाठीच आहे. ईशान्य भारतातील मूळ नागरीकांच्या अधिकारांचे संरक्षण हे आमचे लक्ष्य आहे. यासाठी आम्ही वस्तुस्थिती आणि सत्य यांच्या आधारावर दृढ प्रयत्न करणार आहोत. आमच्यात मतभेद असू शकतात. पण आम्ही गृहयुद्धाला प्रोत्साहन देणार नाही. असा एक संयुक्त मंच स्थापन करण्याचे प्रयत्न यापूर्वीही झाले आहेत. यावेळी हा प्रयत्न साकारला गेला आहे. आम्ही कोणाशीही संघर्ष करण्यासाठी एकत्र आलेलो नसून ईशान्य भारताच्या लोकांच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी एकत्र आलो आहोत. त्यासाठीच आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे प्रतिपादन प्रद्योत माणिक्य यांनीही केले आहे.

Advertisement
Tags :

.