माउंट एव्हरेस्टवर नवा विक्रम
दिवसात 274 गिर्यारोहकांनी केला सर
वृत्तसंस्था/काठमांडू
नेपाळमध्ये असलेले जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टला एकाच दिवसात 274 गिर्यारोहकांनी सर केले. यात तीन भारतीय देखील सामील होते. या सर्वांनी एकाच दिवसात सर्वाधिक चढाईचा नवा विक्रम नोंदविला आहे. सर्व 274 गिर्यारोहक बुधवारी 8,848.86 मीटर उंचर शिखरावर पोहोचले. 150 नेपाळी शेर्पांसमवेत हे गिर्यारोहक एका दिवसात शिखरावर पोहोचल्याची माहिती अभियान संचालक संघाचे महासचिव ऋषिराम भंडारी यांनी दिली आहे. विश्वविक्रम करणाऱ्या टीममध्ये सामील तीन भारतीय गिर्यारोहक तुलसी रे•ाr पालपुनूरी, संदीप अरे आणि अजय पाल सिंह धालीवाल आहेत. या वसंत ऋतूत एव्हरेस्ट शिखरावर पोहोचलेल्यांकडून नोंदविण्यात आलेला हा नवा विक्रम आहे. याचबरोबर 502 गिर्यारोहकांनी चालू वर्षाच्या वसंत ऋतूत एव्हरेस्ट सर करण्याची अनुमती मिळविली आहे. यापूर्वी मे 2019 मध्ये एकाच दिवसात 223 गिर्यारोहक शिखरावर पोहोचले होते, अशी माहिती भंडारी यांनी दिली आहे.
11 व्यांदा शिखराला गवसणी
तर गुरुवारी भारताच्या लक्ष्मीकांत मंडल यांनीही विश्वातील सर्वात उंच शिखर सर केला आहे. मंडल यांनी 6 नेपाळी शेर्पांसमवेत 8 अन्य जणांसोबत एव्हरेस्टचे शिखर गाठले आहे. या वसंत ऋतूत स्थापित करण्यात आलेला अन्य नवा विक्रम नेपाळच्या कामी रीता शेर्पाकडून करण्यात आला आहे, त्यांनी 32 व्यांदा शिखर सर करत स्वत:चाच विक्रम मोडला आहे. अशाचप्रकारे नेपाळच्या ल्हाकपा शेर्पा या हंगामात विक्रमी 11 व्यांदा माउंट एव्हरेस्टवर पोहोचणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.