नव्या रेशनकार्डधारकांनी फसवणुकीपासून सावध रहावे
पंच हमी योजनाध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी
खानापूर : खानापूर तालुक्यातील नागरिकांनी नव्याने रेशनकार्ड मिळवण्यासाठी गेल्या तीन वर्षापूर्वी ऑनलाईन अर्ज करण्यात आले होते. अन्नपुरवठा विभागाकडून अर्जदाराना नव्याने रेशनकार्ड पुरवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र तालुक्यातील रेशनदुकानदार आणि काही सायबर चालक रेशनकार्ड धारकांकडून पाच ते दहा हजार रुपयांची मागणी करून आर्थिक लुबाडणूक करत आहेत. नव्याने रेशनकार्ड देण्यासाठी कोणतेही पैसे आकारण्यात येत नाही. तरी नागरिकांनी आर्थिक लुबाडणुकीपासून सावध रहावे, असे आवाहन पंच हमी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी केले आहे.
कर्नाटक सरकारच्या अन्नपुरवठा विभागाकडून राज्यातील ज्यांचे रेशनकार्ड नाही त्यांना नव्याने रेशनकार्ड देण्यासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात आले होते. याचे सर्वेंक्षण करून अन्नपुरवठा विभागाकडून नव्याने रेशनकार्ड वितरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. ज्या नागरिकांनी रेशनकार्डासाठी अर्ज केला होता. त्यांच्या नावे ऑनलाईन रेशनकार्ड उपलब्ध झाले आहे. ते मिळवण्यासाठी रेशनदुकानदार आणि काही सायबर चालक रेशनकार्ड धारकांकडून पाच ते दहा हजारची आर्थिक लुबाडणूक करत आहेत. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
नागरिकांनी पैसे देवून रेशनकार्ड घेऊ नये
शासनाकडून सर्व सर्वेक्षण पूर्ण करून अन्नपुरवठा विभागाकडून मंजुरी मिळाल्यानंतरच रेशनकार्ड मंजूर करण्यात येते. या संपूर्ण कार्यप्रणालीत कुठेही आर्थिक लुबाडणूक होऊ नये म्हणून शासनाकडून सर्व प्रक्रियाही ऑनलाईन करण्यात आली आहे. असे असताना ग्रामीण भागातील रेशनदुकानदार कार्डधारकांकडून पैसे घेऊन कार्ड वितरण करण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांची नाहक आर्थिक लुबाडणूक होत असल्याचे पंचहमी योजनेच्या अध्यक्षा आणि सदस्यांच्या निदर्शनास आले असल्याने नागरिकांकडून रेशनकार्डासाठी पैसे आकारण्यात येत नसल्याने नागरिकांनी पैसे देवून रेशनकार्ड घेऊ नये, असे आवाहन अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी केले आहे.
खोटे रेशनकार्ड देवून नागरिकांची लुबाडणूक
तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना बीपीएल रेशनकार्ड नव्याने करून देतो असे सांगून 15 हजार रुपये घेऊन खोटे बीपीएल रेशनकार्ड काहीजणांना वितरण करण्यात आले आहे. मात्र जेव्हा रेशनकार्ड धारकांनी संबंधित दुकानदारांकडे जावून रेशनची मागणी केल्यानंतर सदर रेशनकार्ड खोटे असल्याचे सांगितल्याने रेशनकार्डधारकांची फसवणूक झाली आहे. अधिकृत रेशनकार्डसाठी कोणतेही पैसे आकारण्यात येत नसल्याने नागरिकांनी अशा फसवणुकीपासून सावध रहावे, तसेच नव्याने रेशनकार्ड हवे असल्यास तसेच रेशनकार्ड प्रेंटसाठी पैसे मागितल्यास पंचहमी योजनेच्या कमिटीकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.