30 अत्यावश्यक औषधांसाठी नवीन दर जाहीर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रीय औषध दर प्राधिकरणाने (एनपीपीए) 30 अत्यावश्यक औषधांच्या सुधारित किमती निश्चित करत सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये व्हिटॅमिन सप्लिमेंट्स, मधुमेहाची औषधे, रक्तदाबाची औषधे, अँटीबायोटिक्स आणि वेदनाशामकांचा समावेश आहे. नवीन किमती लागू झाल्यानंतर, कंपन्यांना निर्धारित दरापेक्षा जास्त दर आकारता येणार नाही. सर्वसामान्य रुग्णांना परवडणारी औषधे उपलब्ध करून देण्यासाठी आणि आरोग्य खर्च कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. ‘एनपीपीए’चा हा निर्णय औषध खरेदीदारांसाठी सुखद धक्का मानला जात आहे.
केंद्र सरकारच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने 30 नवीन औषध प्रकारांची कमाल किरकोळ किंमत जाहीर केली आहे. यामध्ये व्हिटॅमिन डी3 ओरल सोल्युशन, कॅल्शियम-व्हिटॅमिनडी3-मिथाइलकोबालामिन टॅब्लेट्स आणि मधुमेह, रक्तदाब, वेदना, प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स) व महिलांच्या आरोग्याशी संबंधित अनेक औषधांचा समावेश आहे. या नवीन आदेशानुसार, कंपन्यांना ही औषधे निर्धारित किमतीपेक्षा जास्त दराने विकता येणार नाहीत. यामुळे अत्यावश्यक औषधे अधिक परवडणारी होतील. रुग्णांवरील उपचारांचा आर्थिक भार कमी होईल, असा सरकारचा दावा आहे. ही सवलत प्रामुख्याने पूर्वी किमती जास्त असलेल्या किंवा ज्यांचे समकक्ष ब्रँड बाजारात जास्त किमतीत उपलब्ध असलेल्या औषधांसाठी लागू राहणार आहेत.
मधुमेह रुग्णांना दिलासा
या यादीत एम्पाग्लिफ्लोझिन, सिटाग्लिप्टिन, टेनेलिग्लिप्टिन, विल्डाग्लिप्टिन आणि मेटफॉर्मिन यांसारख्या औषधांचा समावेश आहे. भारतातील लाखो लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. किंमत निश्चितीमुळे दीर्घकालीन उपचारांचा खर्च नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.
वयोवृद्ध आणि महिलांनाही फायदे
व्हिटॅमिन डी3, कॅल्शियम, मिथाइलकोबालामिन आणि मायो-इनोसिटॉल यांसारखी औषधे हाडे, नसा आणि महिलांच्या आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. यांच्या किंमतींमध्येही सुधारणा केल्याने वृद्ध रुग्ण आणि महिलांना लाभ होऊ शकतो.