कोल्हापूरच्या पर्यटनवाढीसाठी नवनवीन प्रकल्प राबवणार
- पर्यटन विकास मंत्री शंभूराज देसाई
- कोल्हापूर, कोकणात पर्यटन व्यवसायाला चांगली संधी
- जिल्ह्यातील आमदारांसमवेत लवकरच बैठक
- भविष्यात पर्यटन स्वतंत्र अर्थव्यवस्था असेल
कोल्हापूर
कोल्हापूरसह कोकणात पर्यटन व्यवसायाला चांगल्या संधी आहेत. येथील पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी नवनवीन प्रकल्प राबवणार आहे. तसेच पर्यटन संदर्भात कोल्हापूरमधील महायुतीच्या आमदारांसोबत लवकरच बैठक घेणार असल्याचे पर्यटन विकास मंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले. तसेच राज्यातही पर्यटन व्यवसायाला फार मोठी संधी असून भविष्यात पर्यटन एक स्वतंत्र अर्थव्यवस्था असेल इतकी क्षमता या क्षेत्रात असल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले. रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर असताना शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
मंत्री देसाई म्हणाले, कोल्हापूर आणि देसाई परिवाराचे जिव्हाळ्याचे नाते आहे. माझे आजोबा लोकनेते बाळासाहेब देसाई कोल्हापूरचे पालकमंत्री होते. माझे शिक्षणही कोल्हापुरात झाले आहे. तेव्हापासून निर्माण झालेले हे नाते माझ्या काळातही जिव्हाळ्याचेच राहिल. पर्यटन विकास, खणीकर्म खाते मिळाले आहे. कोल्हापूरमध्ये पर्यटन वाढीला मोठ्या संधी आहेत. भविष्यात येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले.
मंत्रिमंडळाबाबत बोलताना ते म्हणाले, मंत्रिमंडळाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचा असतो. शिवसेनेच्या खातेवाटपाचे सर्वाधिकार मुख्यनेते एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. त्यानुसार आम्हाला मंत्रिपदे मिळाली. जिल्ह्याचे पालकमंत्री लवकरच ठरतील मात्र जोपर्यंत अंतिम यादी येत नाही तोपर्यंत पालकमंत्री पदावर प्रत्येकजण हक्क सांगू शकतो.
महाविकास आघाडीबाबत बोलताना त्यांनी महाविकास आघाडीमध्ये एकवाक्यता नसल्याचा आरोप केला. अपयशाचे खापर ते एकमेकांवर फोडत आहेत. उबाठा, राष्ट्रवादी शरद पवार गट स्वतंत्र लढण्याची भाषा करत आहेत. सभागृहात त्यांचे 50 पण आमदार नाहीत. तरीही त्यांच्यामध्ये एकवाक्यता नाही. तिन्ही पक्षांची तोंडे तीन दिशेला असल्याचा आरोप मंत्री देसाई यांनी केला. तसेच आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा नक्की फडकेल असा विश्वासही मंत्री देसाई यांनी व्यक्त केला.