टोप येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर! पुलाची शिरोली आरोग्य केंद्रावरिल ताण होणार कमी
सुरेश पाटील/पुलाची शिरोली
टोप ता.हातकणंगले येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले आहे. दक्षिणवाडी (टोप) येथील नवीन आरोग्य केंद्रामुळे पुलाची शिरोली आरोग्य केंद्रातील रुग्णांचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. अशी माहिती शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी श्रीमती जे.जे.अँन्ड्रूस यांनी दै.तरुण भारतशी बोलताना दिली.
पुलाची शिरली आरोग्य केंद्र हे किणी टोल नाका ते तावडे हॉटेल या सुमारे २० किलोमीटर अंतराच्या पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील एकमेव केंद्र आहे. तसेच या केंद्रांतंर्गत असणारी गावाची संख्या व येथील आरोग्य केंद्रात येणार्या रुग्णांची संख्या दररोज शेकडोच्या घरात आहे.
या केंद्रांतंर्गत मौजे वडगाव, हालोंडी , नागाव व टोप आदी गावात उपकेंद्रे आहेत. या उपकेंद्रामध्येही कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे या गावातील रुग्णांच्या तक्रारीला व त्यांच्या रोषाला येथील अधिकाऱ्यांना वारंवार सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर चार शिपायांची आवश्यकता असताना सध्या एकच शिपाई कार्यरत आहे. तोही दिव्यांग असल्यामुळे शिपायाची कामे येथील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेवकांना दररोज पार पाडावी लागत आहेत.
शिरोली औद्योगिक वसाहतीमुळे शिरोलीची लोकसंख्या सुमारे साठ हजारच्या घरात आहे. यामध्ये परप्रांतीय लोकांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे येथील आरोग्य केंद्रात येणाऱ्या बाह्य रुग्णांची संख्या प्रचंड आहे. दररोज सुमारे २०० ते २५० इतके बाह्य रुग्ण उपचारासाठी येथे येतात. त्यामुळे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्यावर मोठा तणाव जाणवत असतो. तसेच येणाऱ्या रुग्णांचे उपचारासाठी नेहमी वादाचे प्रसंग घडत आहेत. तसेच या आरोग्य केंद्रात प्रति महिना सुमारे ३५ ते ४० इतक्या महिलांची प्रसूती पार पाडली जाते.
या व्यतिरिक्त प्रत्येक आठवड्याला नेत्र तपासणी शिबीर, तसेच अन्य शासनाच्या योजनेअंतंर्गत आरोग्य तपासणी शिबिर येथे पार पाडावी लागतात. या कामाव्यतिरिक्तही आरोग्य सेवक व आशा वर्कर्स यांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत असणाऱ्या गावांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सर्वे करण्याचे काम सुरू असते. तसेच एखाद्या वेळेस एखाद्या गावात आरोग्याची साथ उद्भवल्यास त्या गावात ( उदाहरणार्थ डेंगू,मलेरिया , हिवताप, चिकन गुनिया) यासारखे साथीचे आजार पसरल्यास तेथे सर्वे करणे, जनजागृती करणे व वैद्यकीय उपचार करणे अशा कामांची जबाबदारी पार पाडावी लागते.
एकूणच शिरोली आरोग्य केंद्रावरील रुग्णांचा भार पाहता या आरोग्य केंद्रात २०११ च्या जनगणनेनुसार व शासनाच्या परिपत्रकानुसार सुमारे २५ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. पण सध्या बाराच कर्मचारी एवढा मोठा डोलारा सांभाळत आहेत.
परिणामी टोप, संभापूर, कासारवाडी, दक्षिणवाडी, सादळे मादळे आदी गावातील रुगणांना शिरोली आरोग्य केंद्रात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग व टोप ग्रामपंचायत यांनी सामुदाईक प्रयत्न केले. टोप ग्रामपंचायत सरपंच तानाजी पाटील व ग्रामविकास अधिकारी डी.आर.देवकाते यांनी टोपसह कासारवाडी, अंबपवाडी, संभापूर , तासगाव आदी गावातील आरोग्य केंद्र मंजूरीसाठी ठराव गोळा केले. त्यानंतर जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या मार्फत महाराष्ट्र शासन व आरोग्य मंत्री यांच्या कडे पाठपुरावा केला. यासर्व प्रयत्नातून अडीच महिन्यापूर्वी टोप प्राथमिक आरोग्य केंद्रास शासन स्थरावर मंजूरी मिळाली आहे. हा दवाखाना दक्षिणवाडी भागात गट नंबर ५० मध्ये बांधण्यात येणार आहे. यासाठी एक हेक्टर जागेची मागणी करण्यात आली आहे. जागेचा ताबा मिळताच बांधकाम सुरू होणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी देवकाते यांनी दिली.
शिरोली आरोग्य केंद्रात महामार्गावरील अपघात व बाह्य रुगणांची संख्या मोठी आहे. त्यामुळे टोप गावात नवीन आरोग्य केंद्रास तत्काळ मंजूरी मिळाली आहे. यामुळे त्या भागातील रुग्णांचा त्रास कमी होवून तत्काळ वैद्यकीय सेवा मिळण्यास मदत होणार आहे.
डॉ. फारुक देसाई, माता, बाल संगोपन जिल्हा वैद्यकीय अधिकारी, जि.प.कोल्हापूर.