नवीन पोप लिओ-14 व्हॅटिकनमध्ये शपथबद्ध
वृत्तसंस्था/ व्हॅटिकन सिटी
व्हॅटिकनमधील सेंट पीटर्स स्क्वेअर येथे नवीन पोप लिओ-14 यांचा शपथविधी समारंभ संपन्न झाला आहे. 69 वर्षीय रॉबर्ट फ्रान्सिस प्रीव्होस्ट यांची नवीन पोप म्हणून निवड झाली आहे. पोप बनणारे ते अमेरिकेतील पहिले कार्डिनल आहेत. त्यांनी स्वत:साठी ‘पोप लिओ-14’ हे नाव निवडले आहे.
शपथविधी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी जगभरातील अनेक नेते व्हॅटिकनला पोहोचले होते. त्याव्यतिरिक्त या कार्यक्रमात हजारो लोकही सहभागी झाले होते. भारतीय वेळेनुसार रविवारी दुपारी 1:30 वाजता कार्यक्रम सुरू झाला. संपूर्ण शपथविधी सोहळा सुमारे दोन तास चालला. याप्रसंगी कॅथोलिक प्रथा आणि परंपरेनुसार नवीन पोपना धार्मिक वस्त्र आणि अंगठी देण्यात आली. ही धार्मिक वस्त्रs नवीन पोपच्या नियुक्तीचे प्रतीक आहेत. नवीन पोप आणि इतर कॅथोलिक चर्च नेत्यांनी शपथविधी सुरू होण्यापूर्वी बॅसिलिकामधील सेंट पीटरच्या कबरीला भेट देत प्रार्थना केली.