जम्मू-काश्मीरमध्ये नवी राजकीय आघाडी स्थापन
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीर पीपल्स कॉन्फरन्सचे (जेकेपीसी) अध्यक्ष सज्जाद लोण यांनी सोमवारी श्रीनगरमध्ये नव्या राजकीय आघाडीची घोषणा केली आहे. या आघाडीचे नाव ‘पीपल्स अलायन्स फॉर चेंज’ आहे. या आघाडीत लोण यांचा जेकेपीसी, हकीम मोहम्मद यासीन यांचा पीपल्स डेमोक्रेटिक प्रंट (पीडीएफ) आणि जस्टिस अँड डेव्हलपमेंट फ्रंट (जेडीएफ) सामील आहे.
आम्ही आज (सोमवारी) ज्या आघाडीची घोषणा करत आहोत, ती आमच्यावर शासन केलेल्या राजकीय आघाड्यांकरता पर्याय ठरणार आहे असे वक्तव्य लोण यांनी केले आहे. सज्जाद लोण हे हंदवाडाचे आमदार आहेत. जम्मू-काश्मीरमधील ओमर अब्दुल्ला सरकारला काँग्रेस अन् डाव्या पक्षांचे समर्थन प्राप्त आहे. जम्मू-काश्मीरमध्ये भरती प्रक्रियेत काश्मिरींना डावलले जात आहे. अलिकडच्या काळात जारी भरती यादीत काश्मिरींना फारसे स्थान मिळालेले नाही, असे म्हणत सज्जाद लोण यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून अब्दुल्ला सरकारला लक्ष्य केले. काश्मीरच्या रहिवाशांना भरतीतून वगळण्यासाठी लागू करण्यात आले आहे. जोपर्यंत आमच्या युवांवरील हा अभिशाप दूर होत नाही तोवर आम्ही हे मान्य करणार नाही. या मुद्द्यावर योग्य तोडगा काढला जावा असे वक्तव्य लोण यांनी केले आहे.