For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘नीट’ परीक्षार्थींकडून नवी याचिका

06:10 AM Jun 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘नीट’ परीक्षार्थींकडून नवी याचिका
Advertisement

परीक्षा रद्द करण्यासह न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआय तपासाची मागणी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

नीट-युजी 2024 परीक्षा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली 5 मे रोजी झालेल्या परीक्षेतील कथित अनियमिततेची चौकशी सीबीआय किंवा इतर कोणत्याही स्वतंत्र एजन्सीकडे करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षेला बसलेल्या 20 विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) आणि इतरांना पुन्हा परीक्षा घेण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे.

Advertisement

नीट परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांची केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र आणि एनटीएकडून उत्तर मागितले. याचदरम्यान परीक्षेतील व्यापक अनियमितता आणि फसवणूक पाहता पुनर्परीक्षेमुळे केवळ पात्र विद्यार्थ्यांनाच वैद्यकीय संस्थांमध्ये प्रवेश मिळण्यास मदत होईल, असा दावा नव्या याचिकेत करण्यात आला आहे.

प्रश्नपत्रिका फुटल्याची पुष्टी झालेली प्रकरणे पाहता परीक्षेची अखंडता संशयास्पद आहे. याप्रकरणी एफआयआरही नोंदवण्यात आला असून अनेकांना अटक करण्यात आली आहे. घोषित निकालात 67 उमेदवारांना 720 पैकी 720 गुण मिळाले आहेत. 620-720 गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ नोंदवण्यात आली आहे, असे अनेक मुद्दे याचिकेत मांडण्यात आले आहेत.

स्वतंत्र एजन्सीमार्फत चौकशीची मागणी

या याचिकेत सीबीआय किंवा न्यायालयाच्या देखरेखीखाली इतर कोणत्याही स्वतंत्र एजन्सीद्वारे अनियमिततेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. स्वतंत्र चौकशी झाल्यास गुणवंत विद्यार्थ्यांना न्याय मिळू शकेल, असा दावा करण्यात आला आहे. तसेच 620 आणि त्याहून अधिक गुण मिळालेल्या सर्व उमेदवारांची शैक्षणिक पार्श्वभूमी तपासणे, फॉरेन्सिक विश्लेषण आणि तपासणी करण्यासाठी न्यायालयाने नियुक्त केलेल्या आणि देखरेख केलेल्या समिती किंवा इतर स्वतंत्र एजन्सीला निर्देश देण्याची मागणीही केली आहे.

एनटीएला सूचना देण्याचे आवाहन

या याचिकेत एनटीए आणि इतर संबंधित यंत्रणांना परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि निष्पक्षता सुनिश्चितत करण्यासाठी आणि भविष्यात नीट-युजी मधील कथित फसवणूक, प्रश्नपत्रिका फुटी आणि अनुचित माध्यमांशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभावी पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.

प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी 9 उमेदवारांना नोटीस

नीट-युजी प्रश्नपत्रिका फुटीची चौकशी करताना बिहारच्या आर्थिक गुन्हे युनिटने 9 उमेदवारांना चौकशीसाठी बोलावले आहे. विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांचीदेखील चौकशी केली जाणार आहे. नोटीस पाठविण्यात आलेले विद्यार्थी बिहारमधील वेगवेगळ्या जिह्यातील आहेत.

Advertisement
Tags :

.