पीएफआरडएचे नवे ‘एनपीएस सेंट्रल’पोर्टल
आता एनपीएस संबंधीत सेवांच्यासाठी एकच व्यासपीठ उपलब्ध : नव्या बदलांसोबत सुविधा मिळणार
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये (एनपीएस) खाते असेल, तर तुम्हाला माहित असेल की त्यासंबंधित विविध माहितीसाठी तुम्हाला अनेक पोर्टल्सवर लॉग इन करावे लागते. परंतु आता पेन्शन फंड नियामक पीएफआरडीएने ‘एनपीएस सेंट्रल’ नावाचे एक नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केले आहे. याचा उद्देश एनपीएस-संबंधित सेवांसाठी एकच व्यासपीठ उपलब्ध करून देणे आहे, जेणेकरून खाते उघडण्यापासून ते सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळण्यापर्यंतची प्रक्रिया सुलभ करता येणार आहे.
एनपीएस सेंट्रल काय आहे?
एनपीएस सेंट्रल हे एक एकीकृत डिजिटल व्यासपीठ आहे, जिथे एनपीएस सदस्य नवीन खाते उघडण्यापासून ते गुंतवणूक करणे आणि त्यांच्या खात्यांचे व्यवस्थापन करण्यापर्यंत सर्व काही एकाच ठिकाणी करू शकतात. हे व्यासपीठ एनपीएसच्या तीन केंद्रीय नोंदी ठेवणाऱ्या एजन्सी, प्रोटीन, केफिनटेक आणि केम्स यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे.
डेटा कसा सुरक्षित : या तीन एजन्सी तुमच्या नोंदी पूर्वीप्रमाणेच हाताळतील, परंतु या नवीन पोर्टलवर सेवा देण्यासाठी त्या एकमेकांसोबत डेटा सुरक्षितपणे शेअर करतील. म्युच्युअल फंड : ज्याप्रमाणे ‘एमएफ सेंट्रल’च्या प्रारंभाने विविध म्युच्युअल फंड कंपन्यांचा डेटा एकत्र आणला, त्याचप्रमाणे एनपीएस सेंट्रल देखील सर्व एजन्सी, पेन्शन फंड व्यवस्थापक आणि कंपन्यांचा डेटा एकाच ठिकाणी आणेल. याचा थेट उद्देश तीन एजन्सींचे विलीनीकरण करणे नसून, ग्राहकांसाठी सेवा अधिक सुलभ करणे आहे.
ग्राहकांना आणि नोकरदारांना काय फायदा?
नवीन ग्राहकांसाठी: एनपीएसमध्ये सामील होण्याची प्रक्रिया आता खूप सोपी होईल. खाते उघडण्यापूर्वी, लोकांना वेगवेगळ्या योजनांची वैशिष्ट्यो, शुल्क आणि मासिक परतावा यांची तुलना करता येईल. जुन्या ग्राहकांसाठी: तुमचे योगदान तपासा, तुमचे प्रोफाइल अपडेट करा, तुमचे स्टेटमेंट डाउनलोड करा किंवा तक्रार दाखल करा.
कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांसाठी: कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी त्यांच्या कंपनीने एनपीएसचे पैसे जमा केले आहेत की नाही हे सहजपणे पाहू शकतात. सेवानिवृत्ती आणि पैसे काढणे: सेवानिवृत्तीच्या वेळी एनपीएसमधून पैसे काढण्याची प्रक्रिया कधीकधी अवघड असते. ही प्रक्रिया सोपी करण्यासाठी, येत्या काळात मुदतपूर्व पैसे काढणे, पेन्शनचा पर्याय निवडणे आणि अॅन्युइटी कंपनी निवडणे यांसारख्या सुविधादेखील या पोर्टलवर जोडल्या जातील. यामुळे एनपीएस खातेधारकांना सेवानिवृत्तीच्या वेळी आणि पैसे काढण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचे निर्णय घेणे सोपे होईल.
