For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लक्षद्वीपच्या मिनिकॉय येथे नौदलाचा नवा तळ

07:00 AM Feb 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
लक्षद्वीपच्या मिनिकॉय येथे नौदलाचा नवा तळ
Advertisement

मालदीव-चीन विरोधात भारताचे पाऊल : धावपट्टी होणार अपग्रेड

Advertisement

वृत्तसंस्था /लक्षद्वीप

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर आता भारत सरकारने अगाती तसेच मिनिकॉय बेटांवर नौदलाचा  तळ निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. मिनिकॉयवर आयएनएस जटायू नौदल तळ निर्माण केला जात असून याचे उद्घाटन 4 किंवा 5 मार्च रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. मिनिकॉयमध्ये निर्माण होणाऱ्या आयएनएस जटायू तळापासून मालदीवचे अंतर केवळ 524 किलोमीटर आहे. तर भारताच्या अगाती बेटावरील धावपट्टीला अपग्रेड करण्यात येत आहे. या धावपट्टीचा वापर आता लढाऊ विमाने आणि मोठ्या विमानांच्या संचालनासाठी केला जाणार आहे. याचबरोबर येथून मालदीव तसेच चीनच्या हालचालींवर थेट नजर ठेवता येणार आहे. या नौदलाच्या तळाचे उद्घाटन करण्यादरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे आयएनएस विक्रमादित्य आणि आयएनएस विक्रांतवर जात पाहणी करू शकतात. लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेट 9 डिग्री चॅनेलवर आहे.

Advertisement

येथून कोट्यावधी डॉलर्सची व्यापारी मालाची वाहतूक होते. आयएनएस विक्रमादित्य किंवा विक्रांतमधून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह मिनिकॉय बेटाच्या ठिकाणी पोहोचणार आहेत, यावेळी नौदलाच्या युद्धनौका देखील असणार आहेत. म्हणजेच नौदलाच्या पूर्ण लढाऊ ताफ्यासोबत तेथे शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. यातून मालदीव आणि चीन यासारख्या देशांना कठोर संदेश दिला जाणार आहे. भारत सरकारने मिनिकॉयवर धावपट्टी विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. आगाती बेटाच्या धावपट्टीला अपग्रेड करण्यात येणार आहे. याच्या माध्यमातून भारतीय सैन्याला हिंदी महासागर आणि अरबी समुद्रात शांतता प्रस्थापित करता येणार आहे. याचबरोबर हिंद-प्रशांत क्षेत्रातील सागरी सुरक्षा राखता येणार आहे. भारत सरकारने अंदमान आणि निकोबार बेटाच्या कॅम्पबेल खाडीत नवी सुविधा निर्माण केली असून याचा वापर सैन्य करत आहे. पूर्व दिशेला अंदमान आणि पश्चिमेला लक्षद्वीपमध्ये नौदलाचे तळ निर्माण झाल्याने भारताची सागरी सीमा सुरक्षित राहणार आहे.

चिनी कारवाया रोखता येणार

मिनिकॉयमध्ये तळ निर्माण होताच आसपासच्या भागातील चीनच्या कारवायांना आळा बसणार आहे. सुएझ कालवा तसेच पर्शियन उपसागराच्या दिशेने जाणाऱ्या व्यापारी जहाजांना 9 डिग्री चॅनेल म्हणजेच लक्षद्वीप आणि मिनिकॉययुक्त मार्गाने जावे लागते. कुठल्याही जहाजाला सुंदा आणि लोंबकच्या खाडीच्या दिशेने जायचे असल्यास त्याला 10 डिग्री चॅनेल म्हणजेच अंदमान आणि निकोबार बेटसमुहाकडून जावे लागते. अशा स्थितीत दोन्ही ठिकाणी मजबूत सुरक्षा असणे आवश्यक ठरते.

Advertisement
Tags :

.