नूतन मनपा आयुक्त कार्तिक एम. यांनी स्वीकारला पदभार
बेळगाव : महानगरपालिकेच्या नूतन आयुक्त म्हणून वर्णी लागलेल्या कार्तिक एम. यांनी शुक्रवार दि. 28 रोजी आपला पदभार स्वीकारला. महापालिकेतील आयुक्त कक्षात त्यांचे विविध विभागांच्या प्रमुखांकडून व सहकाऱ्यांकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. बेळगाव महानगरपालिकेच्या आयुक्त म्हणून शुभा बी. यांनी ऑक्टोबर 2024 मध्ये पद्भार स्वीकारला होता. मात्र त्यांचा 11 महिन्याचा कार्यकाळ त्यांच्या वेगवेगळ्या निर्णयामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला. त्यामुळे काही दिवसापासून त्यांच्यावर बदलीची टांगती तलवार होती. मावळत्या आयुक्त शुभा बी. नेहमीप्रमाणे गुरुवारी महापालिकेत असतानाच अचानक त्यांच्या बदलीचा आदेश जारी झाला. प्रशासकीय सुधारणा विभागाचे सचिव केशवप्रसाद के. एच. यांनी जारी केलेल्या आदेशात बेळगाव मनपाचे नूतन आयुक्त म्हणून कार्तिक एम. यांची नियुक्ती करण्यात आल्याचे नमूद केले.
कार्तिक एम. हे या पूर्वी बेंगळूरमधील संजय गांधी इन्स्टिट्यूटचे मुख्य प्रशासकीय अधिकारी होते. शुक्रवारी मावळत्या आयुक्त शुभा बी. महापालिकेकडे येऊन पदभार सोपवतील, अशी चर्चा होती. मात्र त्या महापालिकेकडे फिरकल्याच नाहीत. दुपारी 12.30 च्या दरम्यान नूतन आयुक्त कार्तिक एम. हे खासगी वाहनांने महापालिकेत दाखल होऊन ते थेट आयुक्त कक्षात गेले. पद्भार स्वीकारल्यानंतर विविध विभागाच्या प्रमुखांनी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मनपा आयुक्तांनी महापौर कक्षात दाखल होत महापौर मंगेश पवार यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ दिले.
नागरिकांना चांगली प्रशासकीय सेवा देणार,सर्वसामान्य नागरिकांशी संबंधित असणाऱ्या आवश्यक सेवा
महानगरपालिकेकडून पुरविल्या जातात. नागरिकांना त्या सेवा प्रामाणिकपणे दिल्यास त्यांच्या ते कायम लक्षात राहते. यासाठी आम्ही काम केले पाहिजे, स्वच्छ बेळगाव शहर योजना राबविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असून, आपल्या कार्यकाळात नागरिकांना चांगली प्रशासकीय सेवा देणार असल्याचे नूतन मनपा आयुक्त कार्तिंक एम. यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले. नूतन मनपा आयुक्त कार्तिक एम. यांनी शुक्रवारी दुपारी महापालिकेत दाखल होत आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर ‘तरुण भारत’च्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी बातचीत केली. त्यावेळी ते बोलताना म्हणाले, महानगरपालिकेकडून नागरिकांना त्यांना हव्या असलेल्या सेवा दिल्या जातात. पण त्या प्रामाणिकपणे देणे गरजेचे आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. चांगली सेवा मिळावी, यासाठी आपले विशेष प्रयत्न राहतील. स्वच्छ बेळगाव शहर योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील. विकासाबरोबरच चांगली प्रशासकीय सेवा दिली जाईल.