मंत्रिमंडळ पुनर्रचनेसाठी नवोदित आमदारांचे साकडे
काँग्रेसश्रेष्ठींना 31 आमदारांची स्वाक्षरी असणारे पत्र
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात मुख्यमंत्रिपदावरून सिद्धरामय्या व डी. के. शिवकुमार यांच्यात रस्सीखेच सुरू असतानाच दलित मुख्यमंत्रिपदाचा मुद्दा चर्चेत आला आहे. असे असतानाच आता मंत्रिमंडळ पुनर्रचनेची मागणी झाली आहे. प्रथमच विधानसभेवर निवडून आलेल्या 31 आमदारांनी हायकमांडला पत्र पाठविले असून मंत्रिमंडळ पुनर्रचना करून नवोदीत आमदारांनाही संधी द्यावी, अशी मागणी केली आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाचे मुख्य सचिव के. सी. वेणूगोपाल. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला यांना 31 आमदारांनी पत्र पाठविले आहे. मंत्रिमंडळात किमान पाच नव्या आमदारांना संधी द्यावी, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.
कर्नाटकातील जनतेने मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या 38 नव्या चेहऱ्यांना निवडून आणले आहे. याद्वारे विधानसभेत नव्या चेहऱ्यांना संध्घ देण्याची त्यांची अपेक्षा होती. त्यामुळे प्रथमच निवडून आलेल्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देणे योग्य ठरेल. मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्त्वातील 34 जणांच्या मंत्रिमंडळ रचनेवेळी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली नव्हती. युवा, गतिमान व सक्रिय नेतृत्व क्षमता असणाऱ्या आमदारांना मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करण्याची संधी देणे ही काळाची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी हायकमांड व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मंत्रिमंडळात फेरबदल करावे, हे करत असताना पाच नव्या आमदारांना संधी देण्याची विनंती करत आहे, असा उल्लेख आमदारांनी पत्रामध्ये केला आहे.
आम्ही सर्वजण काँग्रेसच्या विचारसरणीचे काटेकोरपणे पालन करतो. कर्नाटका स्वच्छ, पारदर्शक आणि विश्वासार्ह प्रशासन देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. यामुळे 2028 च्या विधानसभा निवडणुकीत आम्ही राज्यात पुन्हा सत्तेवर येऊ शकतो. युवा आणि अनुभवाचे मिश्रण नेहमीच संतुलित विकासासाठी चांगले वातावरण निर्माण करेल. आमच्या विनंतीची दखल घेतली जाईल, असा विश्वास आहे, असा उल्लेखही प्रथमच निवडून आलेल्या काँग्रेसमधील 31 आमदारांनी पत्रामध्ये केला आहे.
आमदारांच्या प्रमुख मागण्या...
► सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाल्याने मागील आश्वासनाप्रमाणे मंत्रिमंडळ पुनर्रचना करावी.
► अपेक्षित प्रमाणात कामगिरी न केलेल्या मंत्र्यांना वगळून नव्या दमाच्या आमदारांना मंत्रिपदे द्यावीत.
► सर्व जिल्ह्यांना समान प्रतिनिधीत्व मिळेल अशा पद्धतीने मंत्रिमंडळात फेरबदल करावेत.
पत्रावर कुणाकुणाच्या स्वाक्षऱ्या...
महेंद्र तम्मण्णावर-कुडची, बाबासाहेब पाटील-कित्तूर, विश्वास वैद्य-सौंदत्ती यल्लम्मा,
इक्बाल हुसेन-रामनगर, ए. एस. पोन्नण्णा-विराजपेठ, बी. बी. चिम्मनकट्टी-बदामी,
प्रदीप ईश्वर-चिक्कबळ्ळापूर, अशोककुमार रै-पुत्तूर, एन. टी. श्रीनिवास-कुडिलगी, दर्शन ध्रुवनारायण-नंजनगूड, बसवराज शिवगंगा-चन्नगिरी, नारा भरतरे•ाr-बळ्ळारी शहर, प्रकाश कोळीवाड-राणेबन्नूर, के. एस. आनंद-कडूर, मंथरगौडा-मडिकेरी, चन्नारे•ाr पाटील-यादगिरी, देवेंद्रप्पा-जगळूर, डी. रवीशंकर-कृष्णराजनगर, नयना मोटम्मा-मुडिगेरे, राजावेणुगोपाल नायक-सुरपूर, ए. सी. श्रीनिवास-पुलकेशीनगर, अशोक मनगुळी-सिंदगी, रवी गणिग-मंड्या, उदयगौडा-मद्दूर.