मोरबग्गी येथे नवीन एमआयडीसी मंजूर
सांगली :
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला राज्य शासनाने जत तालुक्यातील मोरबग्गी येथे औद्योगिक वसाहतीला मंजूरी दिली आहे. तर उमदी औद्योगिक वसाहतीचे लवकरच गॅझेट प्रसिध्द होणार असून तासगाव तालुक्यातील योगेवाडी येथील औद्योगिक वसाहतीचा आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यामुळे नव्या वर्षात जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
शासनाच्या लेखी जत तालुक्याचा क्रमांक शेवटचा. पिढ्यानपिढया दुष्काळाचा शिक्का भाळी असणे ही या तालुक्याची आणखी ओळख. पाण्याच्या प्रतीक्षेत या तालुक्यातील अनेक पिढया खपल्या. परंतु आश्वासनाशिवाय त्यांच्या पदरी काहीच पडले नाही. परंतु आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही महिन्यापूर्वी उमदी औद्योगिक वसाहत मंजूर झाल्याची घोषणा केली. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी औद्योगिक वसाहतीच्या मंजुरीचे पत्र आमदार पडळकर यांच्या प्रचार सभेत दाखवत त्यावर शिक्कामोर्तब केले. आता उमदी औद्योगिक वसाहतीच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोनवेळा जागेची पहाणी केली असून शासनाकडे माहितीसह प्रस्ताव पाठवला आहे. लवकरच या एमआयडीसीचे गॅझेट निघण्याची शक्यता आहे. या वसाहतीमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकातील उद्योजक येण्यास इच्छूक आहेत. कर्नाटकातील काही उद्योजकांनी चौकशीही सुरू केली असल्याचे समजते.
मोरबग्गी एमआयडीसी 24.63 हेक्टरवर
जत तालुक्यातील उमदी एमआयडीसी निर्मितीची प्रक्रिया सुरू असतानाच मोरबग्गी एमआयडीसीला शासनाने मंजुरी दिली आहे. राज्य सरकारच्या शासनाची 24.63 हेक्टर जमीन या एमआयडीसीसाठी हस्तांतर करण्यात येणार आहे. शासकीय जमिनीवर एमआयडीसी सुरू होणार असल्याने लवकरच जागा हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
पाण्याची आवश्यकता नसणारे उद्योग आणणार
जत पूर्व भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. विस्तारीत म्हैसाळ योजनेमुळे काही दिवसांत पाण्याची अडचण दूर होईल. परंतु सध्या पाण्याची आवश्यकता नसणारे इंजिनिअरिंग बेस असणारे उद्योग सुरू करण्यासाठी आमचे प्राधान्याने प्रयत्न राहतील, अशी माहिती आ. पडळकर यांनी दिली. आगामी पाच वर्षात जतच्या पाणी, उद्योग आणि विकासावरच आपण काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
योगेवाडी औद्योगिक वसाहतींचा आराखडा तयारी सुरू
गेल्या अनेक दिवसांपासून तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघातील योगेवाडी औद्योगिक वसाहतीचे काम आता अंतीम टप्प्यात आले आहे. 36 हेक्टरवर असणाऱ्या या वसाहतीचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. भुसंपादन झाले असून आता अंतर्गत सुविधा निर्मितीलाही सुरवात होईल, अशी माहिती एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी सौ. वसुंधरा बिरजे जाधव यांनी दिली.
शाळगावमध्ये उद्योजकांना निमंत्रण
कडेगाव तालुक्यातील शाळगाव एमआयडीसीमध्ये सुमारे शंभर प्लॉट शिल्लक आहेत. त्यापैकी सहा प्लॉट 22 गुंठयापर्यंत तर सहा प्लॉट 50 गुंठयांचे आहेत. रस्ते, वीज, पाणी सर्व सुविध असणाऱ्या या औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योजकांना निमंत्रित करण्यात येत आहे. यासाठी ऑनलाईन निवीदा प्रसिध्द करण्यात आली आहे. परराज्यातील उद्योजकांनी या औद्योगिक वसाहतीमध्ये येण्यास इच्छूक आहेत. सांगली, मिरज परिसरातील उद्योजकांनी या वसाहतीमध्ये यावे, ऑनलाईन निवीदा प्रक्रियेत सहभाग घ्यावा, असे आवाहन सौ. बिरजे जाधव यांनी केले आहे.