नवा मांडवी पूल बंदचा आदेश मागे
दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अडथळा होऊ नये म्हणून निर्णय : डागडुजीसाठी नवीन तंत्रज्ञान वापरणार
पणजी : दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना अडथळा होऊ नये म्हणून नव्या मांडवी पुलाच्या दुऊस्तीचे काम पुढे ढकलण्यात आले असून 2 मार्चपासून नवा मांडवी पूल बंद ठेवण्याचा आदेश मागे घेण्यात आला आहे, असे बांधकाम खात्याचे विभाग-7 (राष्ट्रीय महामार्ग) कार्यकरी अभियंता ज्युड कार्व्हालो यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी याबाबत दिलेल्या आदेशानंतर पूल बंदचा आदेश मागे घेण्यात आला आहे. 18 मार्चपासून केवळ चार ते पाच दिवस नवा मांडवी पूल बंद राहील. डागडुजीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. त्यामुळे कमी कालावधी लागेल. नवा मांडवी पूल 2 मार्चपासून 10 मार्चपर्यंत दुऊस्तीसाठी बंद ठेवण्याचा आदेश बांधकाम खात्याने जारी केल्यानंतर वाहतूक खात्याला पूल बंद करण्यास सांगितले होते.
त्यानंतर वाहतूक खात्याने काही अडचणी बांधकाम खात्याकडे मांडल्या होत्या. प्रामुख्याने 2 ते 10 मार्च या काळात पूल बंद केल्यास परीक्षार्थी व पालकांचे कसे हाल होतील, याकडे लक्ष वेधले होते. जुन्या पुलावरून वाहतूक वळविली तरी त्या पुलाची भारवाहक क्षमता 12 टनापेक्षा कमी वाहनांची असल्याने त्यावरुन प्रवासी बस जाणे शक्य नाही. त्यामुळे पर्वरीहून पणजीकडे येणारी 12 टनापेक्षा जास्त वजनाची वाहने अटलसेतूवऊन वळवावी लागतील. त्यामुळे मेरशी जंक्शनवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. पणजी कुजीरातील शाळांमध्ये परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना उशीर होऊन त्यांचे नुकसान होणार होते. जुन्या पुलावर एखादा अपघात झाला तर वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पणजीत जाण्याचे सर्व मार्ग बंद होतील. अटलसेतूवरून दुचाकी सोडणेही धोक्याचे असल्याने पर्यायी व्यवस्था रहाणार नाही, म्हणून पूल बंद ठेवण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे.