दुरुस्तीसाठी आजपासून नवा मांडवी पूल बंद
पणजी : मांडवीवरील नवीन पुलाचे दुरुस्तीकाम हाती घेण्यात येणार असून त्यानिमित्त आज दि. 27 पासून हा पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. दि. 5 एप्रिल पर्यंत त्याची दुरुस्ती पूर्ण होण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महिन्याभरापूर्वीच जुन्या मांडवी पुलाचे दुरुस्तीकाम पूर्ण करण्यात आले आहे. त्यावेळी सुमारे 15 दिवस पूल बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर दि. 2 ते 10 मार्च दरम्यान मांडवीवरील नवीन पुलाचेही दुरुस्तीकाम हाती घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र त्याच दरम्यान शालांत परीक्षा सुरू होणार असल्याने विद्यार्थी व पालकांचे हाल होऊ नयेत असा विचार करून दुरुस्तीकाम लांबणीवर टाकण्यात आले होते. ते आता आजपासून प्रारंभ होत आहे. या दहा दिवसांच्या काळात सर्व प्रकारची वाहतूक दुरुस्त केलेल्या जुन्या पुलावरून वळविण्यात येणार आहे. तर 12 टनांपेक्षा जास्त वजनाची वाहने अटल सेतूवरून जाणार आहेत. याबाबत साबांखाने नुकताच आदेश जारी केला आहे. नवा मांडवी पुल बंद करण्याचा निर्णय झाला होता. मात्र त्याला विरोध झाल्याने दुरुस्ती काम पुढे ढकलण्यात आले होते. अखेर ते आजपासून मार्गी लागणार आहे.