नवीन महाबळेश्वर प्रकल्पाला मिळाली गती
पाचगणी :
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा जिह्यातील नवीन महाबळेश्वर प्रकल्पासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सातारा जिह्याच्या पर्यटनाच्या विकासासाठी आणि या प्रकल्पाला गती देण्यासाठी शिंदे यांनी महाबळेश्वरमध्ये एमएसआरडीसीचे कार्यालय सुरू करण्याचे आदेश दिले. दरम्यान, यावेळी एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री पदावरुन मी नाराज नसून दरे या गावी कामानिमित्त आलो असे सांगून नाराजीनाट्यावर पडदा टाकला.
एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाच्या संदर्भात अधिकाऱ्यांसोबत बैठकीत विविध विकासकामांचा आढावा घेतला. नवीन महाबळेश्वर प्रकल्पाचा भाग असलेल्या 235 गावांनी यासाठी मान्यता दिली आहे, तर आणखी 295 गावांनी या प्रकल्पात सामावून घेण्याची मागणी केली आहे. या प्रकल्पामुळे जावळी, महाबळेश्वर, पाटण यासारख्या दुर्गम भागात पर्यटनाचा विकास होईल, तसेच संपूर्ण देश आणि जगभरातील पर्यटकांसाठी या क्षेत्राला आकर्षक बनवले जाईल.
एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, सातारा जिह्याच्या विकासासाठी आणि या भागाच्या पर्यटनाच्या वाढीसाठी मी कायम सक्रिय राहीन. माझ्यावर राज्याची जबाबदारी आहे, आणि स्थानिकांचा विकास साधण्यासाठी मी येथे आलो आहे.
दरम्यान, राज्यामध्ये पालकमंत्री पदावरून नाशिक व रायगडच्या जागेवरून नाराजीनाट्या जोरात चर्चेचा विषय झाला असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज आहेत म्हणूनच महाबळेश्वर तालुक्यातील त्यांच्या मूळ निवासस्थानी दरे या गावांमध्ये आले आहेत अशी चर्चा होत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन महाबळेश्वरच्या प्रकल्पासाठी आपण सातारा जिह्याचा सुपुत्र म्हणून या जिह्याचा कायापालट करण्यासाठी आणि सातारा जिल्हा हा जागतिक नकाशावर येण्याच्या दृष्टिकोनातून आपण येथे आलो आहोत. पर्यटन वाढीसाठी आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नवीन महाबळेश्वरच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाचा प्रकल्प या ठिकाणी आणला आहे आणि त्यासाठी इथल्या जनतेचे भलं करण्यासाठी मी इथे आलो असल्याचा खुलासा देखील नाराजीनाट्यावर पडता टाकून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितला.
एमएसआरडीसीचे कार्यालय महाबळेश्वरमध्ये सुरू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे स्थानिकांना महाबळेश्वर प्रकल्पाशी संबंधित कार्यासाठी अधिक सुलभता मिळेल. शिंदे यांच्या या निर्णयामुळे महाबळेश्वर, पाचगणी, जावळी आणि पाटण तालुक्यांतील दुर्गम भाग जागतिक पर्यटन नकाशावर येणार आहेत.