For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देखावे नवे... गर्दीचे थवे!

06:27 AM Sep 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
देखावे नवे    गर्दीचे थवे
Advertisement

प्रबोधनाची पायवाट चोखाळण्याचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून प्रयत्न

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

उत्सव हे केवळ साजरे करण्यासाठी कधीच नसतात. त्याच्यातून प्रबोधन व्हावे, कला वृद्धींगत व्हावी, गुणवंतांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे हा त्याचा हेतू असतो. गणेशोत्सवाला तर सार्वजनिक असे विशेषण लागले आहे. त्यामुळे या उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाची सुद्धा अपेक्षा आहे. बेळगाव शहरामध्ये सध्या अशी प्रबोधनाची पायवाट चोखाळण्याचा प्रयत्न सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी केला आहे.

Advertisement

शहरातील सर्वच मंडळांनी अत्यंत उत्कृष्ट अशा श्रीमूर्ती स्थापन केल्या आहेत. तर काही मंडळांनी देखावे सादर केले आहेत. नोंद घेण्याजोगी बाब म्हणजे काही मंडळांनी सामाजिक प्रश्नांना हात घालून प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे. यंदाचा गणेशोत्सव अपूर्व उत्साहात साजरा होत असला तरी कोलकाता आणि बदलापूर येथे घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटनेचे पडसादही त्यातून उमटत आहेत.

याच पार्श्वभूमीवर मंडळांनी या प्रकरणी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. अनगोळ रघुनाथ पेठ येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने महिलांवर होणाऱ्या बलात्काराच्या घटनेचा तीव्र निषेध नोंदविला आहे. या मंडळाने जीवंत देखावा सादर करत मुलींची छेड काढणाऱ्या व महिलावर अत्याचार करणाऱ्या तरुणांना छत्रपती शिवराय डोळे फोडण्याची, पाटीलकी रद्द करण्याची आणि हात-पाय कलम करण्याची शिक्षा सुनावतात हा प्रसंग अधोरेखित केला आहे.

अत्याचाराच्या घटनेला देखावाच्या माध्यमातून वाचा

कंकणवाडी आयुर्वेदिक कॉलेजने कोलकाता येथील महिला अत्याचाराच्या घटनेला देखावाच्या माध्यमातून पुन्हा वाचा फोडली आहे. आणि बलात्काऱ्यांना फाशीचीच शिक्षा द्यावी, असे सूचित केले आहे. मुख्य म्हणजे एका बाजूला द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग साकारून, द्रौपदीच्या मदतीला कृष्ण धावला, परंतु आजच्या महिलांनी स्वत:च खड्ग उगारावे, असे सूचविले आहे.

महिला सबलीकरणाला प्राधान्य 

वडगाव, भारतनगर तिरंगा सेवा संघटनेच्या गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महिला सबलीकरणाला प्राधान्य दिले आहे. मुलीनी स्वत: कसे सक्षम व्हावे, व अन्यायाविरुद्ध कसा आवाज उठवावा, हे या मंडळाने दाखविले आहे. समर्थनगर येथील एकदंत युवक मंडळाने गड-किल्ल्यांचे संरक्षण किती महत्त्वाचे आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या मंडळाचे कार्यकर्ते दरवर्षी गड-किल्ल्यांना भेट देतात आणि त्यापासूनच त्यांना प्रेरणा मिळाली आहे. याशिवाय मंडपाच्या सभोवती त्यांनी वीर-योद्ध्यांची माहिती देणारे फलक लावले आहेत.

सातत्याने वेगवेगळे देखावे सादर करणाऱ्या हिंदूनगर, राणाप्रताप रोड टिळकवाडी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने झुलता पूल उभा केला आहे. सध्या गोकाक येथील झुलत्या पुलावर जाण्यास निर्बंध असले तरी ती हौस या झुलत्या पुलावर पुरवून घेणे शक्य आहे. त्यामुळे हा देखावा पाहण्याजोगा आहे. नेहरुनगर येथील बसवाण्णा मंदिरनजीकच्या गणेशोत्सव मंडळाने रासलीला हा देखावा सादर केला आहे. तर गवळी गल्ली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने म्हशी पळविण्याचा देखावा सादर करून आपल्या चरितार्थाच्या साधनाला मान दिला आहे.

शिवाजीनगर गणेशोत्सव मंडळाची केदारनाथाची प्रतिकृती

शिवाजीनगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केदारनाथाची प्रतिकृती साकारली आहे. त्यामुळे ज्यांना आजपर्यंत केदारनाथ मंदिराला जाणे शक्य झाले नाही, त्यांना हे मंदिर कसे आहे, याची प्रचिती नक्की येते. एसपीएम रोडवरील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मंगळागौरीच्या खेळांचा देखावा सादर करून आपली परंपरा जपली आहे. माळी गल्लीच्या गणेशोत्सव मंडळाने पर्यावरणपूरक देखावा सादर केला आहे. एक बी किंवा बियाणे पेरल्याने अनेक रोपे उगवतात आणि शेतीचा विकास होतो, असे सूचित करत या मंडळाने शेतीला महत्त्व दिले आहे. तर तानाजी गल्लीतील मंडळाने अॅनाकोंडाचा देखावा सादर करून बालचमूंचे लक्ष वेधून घेतले आहे.

शहराप्रमाणेच तालुक्यातही ठिकठिकाणी अत्यंत कलात्मक आणि प्रबोधनपर देखावे सादर करण्यात आले आहेत. त्यामध्ये सुळगे, मारुती गल्ली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पावनखिंडची प्रतिकृती उभारली आहे. हा देखावा पाहण्यासाठी आपल्याला खिंडीतूनच जावे लागते आणि हा अनुभव रोमांचकारी ठरतो.

प्रत्येक मंडळाने कल्पकतेने देखावे उभे केले आहेत आणि ते पाहण्यासाठी गर्दीही होत आहे. देखावे पाहणाऱ्या गणेशभक्तांनी दिलेली कौतुकाची दाद हीच कार्यकर्त्यांच्या आणि कलाकारांच्या श्रमाची पावती होय.

Advertisement
Tags :

.