For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तिरुपती प्रसाद प्रकरणी नवे तपास दल स्थापन

06:35 AM Oct 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
तिरुपती प्रसाद प्रकरणी नवे तपास दल स्थापन
Advertisement

सर्वोच्च न्यायालयाचा पुढाकार : अन्वेषणावर देखरेख ठेवण्याचे उत्तरदायित्व सीबीआयकडे

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

सध्या देशभरात गाजत असलेल्या तिरुपती लाडू प्रसाद भेसळ प्रकरणाचा तपास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नवे तपास दल स्थापन करण्याचा आदेश दिला आहे. नव्या तपास दलात सीबीआयचे दोन अधिकारी, आंध्र प्रदेश पोलिसांचे दोन अधिकारी आणि भारतीय अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता प्राधिकरणाचा एक अधिकारी समाविष्ट करण्याचा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला आहे.

Advertisement

लाडू प्रसादातील भेसळीचा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा आहे. या प्रश्नाशी तिरुपतीच्या भगवान व्यंकटेश्वराच्या कोट्यावधी भक्तांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे या भेसळीच्या आरोपांची चौकशी स्वतंत्र अन्वेषण दलाकडून होणे आवश्यक आहे. हा मुद्दा लक्षात घेऊन न्यायालय नव्या अन्वेषण दलाच्या स्थापनेचा आदेश देत आहे. नव्या दलाच्या अन्वेषण (तपास) कार्यावर देखरेख ठेवण्याचे उत्तरदायित्व सीबीआय प्रमुखांवर सोपविण्यात येत आहे. लवकरात लवकर हा तपास होण्याची आवश्यकता आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

न्यायालय राजकारणासाठी नाही

न्या. भूषण गवई आणि न्या. के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी केली जात आहे. प्रसादाच्या लाडूंमध्ये भेसळ झाल्याच्या आरोपांची सत्यासत्यता न्यायालयाने पडताळलेली नाही. मात्र, या प्रकरणी स्वतंत्र दलाच्या माध्यमातून चौकशी होणे आवश्यक आहे. या प्रकरणात कोणी काय आरोप केले याच्याशी न्यायालयाचा संबंध नाही. न्यायालयाचा उपयोग आम्ही राजकीय आखाड्यासारखा होऊ देणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

निवड कोण करणार?

विशेष अन्वेषण दलातील अधिकाऱ्यांची निवड कोणी करावी, याचेही स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले आहेत. सीबीआयच्या दोन अधिकाऱ्यांची निवड सीबीआय प्रमुखांनी करावी. आंध्र प्रदेशच्या दोन पोलीस अधिकाऱ्यांची निवड आंध्र प्रदेशच्या पोलीस विभागाने करावी आणि अन्न प्राधिकारणाचा प्रतिनिधी त्या प्राधिकारणाने निर्धारित करावा, असा आदेश देण्यात आला आहे.

वकिलांचे युक्तिवाद

या प्रकरणात मागच्या वायएसआर काँग्रेस सरकारच्या वतीने कपिल सिब्बल, तिरुपती देवस्थानच्या वतीने मुकुल रोहटगी आणि केंद्र सरकारच्या वतीने महाधिवक्ता तुषार मेहता यांनी युक्तिवाद केले. आंध्र प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या अन्वेषण दलाला आक्षेप नसल्याचे मेहता यांनी स्पष्ट केले. तर आंध्र प्रदेशच्या दोन पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश अन्वेषण दलात करण्यास विरोध नसल्याचे रोहटगी यांनी प्रतिपादन केले. मात्र, लाडू करण्यासाठीचे भेसळयुक्त तूप देवस्थान समितीने देवस्थानाच्या परिसरात येऊ दिलेच कसे, असा प्रश्न कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला. मागच्या वायएसआर काँग्रेस सरकारने जो आदेश दिला होता, तोच आम्ही पाळत होतो, असे उत्तर रोहटगी यांनी या प्रश्नावर दिले.

प्रकरण काय आहे?

जगप्रसिद्ध तिरुपती देवस्थानाकडून वितरीत होणाऱ्या भगवान व्यंकटेश्वराच्या लाडू प्रसादात गाय आणि डुक्कर यांची चरबी, तसेच माशांचे तेल यांची भेसळ करण्यात आली होती, असा आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी काही आठवड्यांपूर्वी केला होता. हा भेसळीचा प्रकार आंध्र प्रदेशात मागे कार्यरत असणाऱ्या वायएसआर काँग्रेसच्या काळात घडला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे एकाच खळबळ उडाली होती. वायएसआर काँग्रेसने आरोप फेटाळला होता. हा आरोप चार राष्ट्रीय प्रयोगशाळांच्या अहवालावर आधारित होता. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचले असून नवे अन्वेषण दल स्थापन होणार आहे.

Advertisement
Tags :

.