‘इन्व्हेस्ट कर्नाटक’मध्ये नव्या औद्योगिक धोरणाची घोषणा
उद्योगमंत्री एम. बी. पाटील : 11 रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन
प्रतिनिधी/ बेंगळूर
बेंगळूरच्या राजवाडा मैदानावर 11 ते 14 फेब्रुवारीदरम्यान ‘इन्व्हेस्ट कर्नाटक-2025’ जागतिक भांडवल गुंतवणूक परिषद होणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे या परिषदेचे उद्घाटन करतील. याच दिवशी नवे औद्योगिक धोरण 2025-30 जाहीर केले जाणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांनी दिली.
बेंगळूरमध्ये शनिवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बेंगळूरमध्ये 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता राजनाथ सिंह या गुंतवणूक परिषदेला चालना देतील. राज्यपाल थावरचंद गेहलोत, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी या कार्यक्रमात सहभागी होतील. मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवतील. चार दिवस चालणाऱ्या या परिषदेत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, एच. डी. कुमारस्वामी, व्ही. सोमण्णा, शोभा करंदलाजे, पियुष गोयल, निर्मला सीतारामन, अश्विनी वैष्णव सहभागी होणार आहेत. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे समारोप कार्यक्रमाला उपस्थित राहतील, अशी माहिती मंत्री एम. बी. पाटील यांनी दिली.
परिषदेच्या माध्यमातून राज्यात 10 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करार होण्याचा विश्वास आहे. परिषदेच्या उद्घाटनादिवशीच नवे औद्योगिक धोरण 2025-30 आणि सिंगल विंडो पोर्टलचे अनावरण करण्यात येईल. 12 फेब्रुवारी रोजी राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासात योगदान देत असलेल्या 14 कंपन्यांच्या प्रमुखांचा सत्कार केला जाईल. 35 लघु आणि मध्यम स्तरावरील उद्योग, 13 रोजी जिल्हा स्तरावर अत्युत्तम कामगिरी केलेल्या महिला उद्योजक, विभागनिहाय उद्योग उत्कृष्टता साध्य केलेल्या उद्योजकांचा सत्कार केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
19 देशांतील विविध कंपन्यांचे प्रतिनिधीही परिषदेत सहभागी होणार आहेत. भविष्यातील उत्पादन क्षेत्र, वाहतूक आणि पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मिती क्षेत्रांवर विशेष भर दिला जाणार आहे. 60 हून अधिक स्टार्टअप्स अत्याधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरण आणि त्यावर आधारित उपाय प्रदर्शित करतील.
विजापूरमध्ये सोलार सेल पार्क, अॅग्रो पार्क
कोलार जिल्ह्यातील श्रीनिवासपूर येथे आधुनिक फार्मा पार्क, विजापूरमध्ये सोलार सेल पार्क आणि कृषी उत्पन्न आधारित अॅग्रो पार्क, चित्रदुर्गमध्ये ड्रोन पार्क, जंगमनकोटे येथे सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या नावाने डीप-टेक पार्क, दासबपेठनजीक हनुमंतपूर येथे मेगा लॉजिस्टीक पार्क, चिक्कबळ्ळापूर व धारवाड जिल्ह्यात ईव्ही क्लस्टर्स स्थापन करण्यात येतील. हुबळी विमानतळाजवळ 200 एकर परिसरात 400 पेक्षा अधिक स्टार्टअप्ससाठी स्टार्टअप पार्क, विजापूरच्या तिडगुंदी येथे 1200 एकरात सोलार सेल पार्क व अॅग्रो टेक पार्क निर्माण केले जाणार आहे, अशी माहितीही मंत्री एम. बी. पाटील यांनी दिली.