रोजगार संधीच्या नव्या आशा
देशातील टायर 2 आणि टायर 3 या शहरांमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये नोकर भरतीचे प्रमाण 21 टक्क्यांनी वाढलेले पहायला मिळाले. ही बाब नव्या रोजगार शोधू पाहणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची ठरली आहे. टायर 2 आणि टायर 3 शहरांतील नव्या युवकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होत आहेत. अलीकडेच एका अहवालामध्ये देशातील तरुणांना मिळालेल्या नोकरी संदर्भातील माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार टायर 2 आणि टायर 3 शहरांमध्ये सप्टेंबर महिन्यात 21 टक्के नोकरभरती वाढली आहे. या शहरांमध्ये पाहता जयपूर, लखनौ, कोईमत्तूर, इंदोर, सुरत, कोची, भुवनेश्वर, नागपूर आणि चंदीगड यांचा समावेश आहे. इ-कॉमर्स कंपन्या, रिटेल कंपन्यांचा विस्तार, ग्राहक मदत केंद्रे आणि पर्यटन सारख्या उद्योगांमुळे भरतीमध्ये वाढ झालेली आहे. वर्षाच्या आधारावर पाहता नोकर भरतीचे प्रमाण 17 टक्के तर महिन्याच्या आधारावर नोकर भरती 4 टक्के वाढीव दिसते. उत्सवी हंगामामुळे सप्टेंबरमध्ये नोकर भरती अधिक दिसून आली. मेट्रो शहरांनीसुद्धा याबाबतीत भरतीत चांगले योगदान दिले. 2024 पेक्षा 2025 चा उत्सवी हंगाम हा अधिक नोकऱ्या उत्पन्न करुन देणारा ठरला आहे. दिल्ली-एनसीआर, मुंबई, बेंगळूर, हैद्राबाद, चेन्नई, पुणे, कोलकत्ता या सारख्या शहरांत भरतीचे प्रमाण 14 टक्के वर्षाच्या आधारावर वाढलेले दिसून आले. या वाढीमध्ये योगदान देण्यात माहिती तंत्रज्ञान कंपन्या, माध्यम आणि मनोरंजन कंपन्या यांचा वाटा सर्वाधिक राहिला आहे. या क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञान, वित्त आणि विपणन विभागामध्ये तज्ञांना नोकरी उपलब्ध झाली आहे. सेल्स आणि मार्केटिंग विभाग व कस्टमर्स सपोर्ट विभाग यांनी अनुक्रमे नोकर भरतीत 5, 4 टक्के वाढ नोंदविली आहे.
याच दरम्यान भारतातील नोकर भरती आर्थिक वर्ष 2025-26 च्या दुसऱ्या सहामाहीत 4.4 टक्के वाढू शकते, असा अंदाज टीमलिज सर्व्हिसेस यांनी नुकताच वर्तविला आहे. पहिल्या सहामाहीपेक्षा दुसऱ्या सहामाहीत भरतीचे प्रमाण 2.8 टक्के वाढीव दिसणार आहे. वर्षाच्या आधारावर पाहता मात्र भरतीचे प्रमाण 7 टक्के कमी राहणार आहे. 23 क्षेत्रे आणि 20 शहरांमध्ये कंपनीने नुकताच एक सर्वे केला होता. या सर्वेक्षणामध्ये 56 टक्के कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढीचे संकेत व्यक्त केले आहेत. भरतीत पाहता मध्यम आणि लघु व्यावसायिक कंपन्या अधिक सतर्क राहिल्या आहेत. एप्रिल-जूनमध्ये भारताचा जीडीपी दर 7.8 टक्के इतका चांगला राहिला होता. अर्थव्यवस्था रुळावर आहे. उद्योग वाढत आहेत.भरती प्रमाण वाढविण्यासाठी ई कॉमर्स कंपन्या, टेक स्टार्टअप कंपन्या, लॉजिस्टीक्स आणि रिटेल कंपन्या यांच्याकडून विशेष प्रयत्न होत आहेत. या कंपन्यांकडून 8 ते 12 टक्के इतकी नोकरभरती अधिक करण्यात आली आहे. ग्राहकोपयोगी वस्तु आणि इलेक्ट्रीक वाहन पायाभूत सुविधांचे क्षेत्र विस्तारत असून या क्षेत्रात रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. संवाद कौशल्य, संगणक कौशल्याचे ज्ञान असणाऱ्या उमेदवारांना भरतीमध्ये संधी मिळत आहे. दुसरीकडे मध्यंतरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढील 5 वर्षात इलेक्ट्रीक वाहन उद्योगांमार्फत 5 कोटी लोकांना रोजगार प्राप्त होणार असल्याचे सुतोवाच केले होते. गडकरी यांनी केलेले वक्तव्य हे नवे रोजगार शोधणाऱ्यांसाठी आनंदाचेच म्हणायला हवे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 2030 सालापर्यंत भारतातील इलेक्ट्रीक वाहन बाजारपेठेची उलाढाल 20 लाख कोटी रुपयांवर पोहोचणार असल्याचे म्हटले होते. वाहन क्षेत्रात पुढील 5 वर्षांमध्ये 5 कोटी लोकांना रोजगार मिळू शकणार आहे. इलेक्ट्रीक वाहन उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार हरतऱ्हेचे प्रयत्न करत आहे. सरकारच्या प्रोत्साहनामुळेच इलेक्ट्रीक वाहन उद्योग गती घेण्याच्या स्थितीमध्ये आहे. एकंदरच रोजगाराच्याबाबतीत पाहता येता काळ महत्त्वाचा असणार आहे.
-दीपक कश्यप