‘डीजीसीए’कडून नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी
व्हीव्हीआयपी आता वैमानिकांवर दबाव टाकू शकणार नाहीत
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी यांना घेऊन जाणाऱ्या नॉन-शेड्यूल्ड विमान आणि हेलिकॉप्टर ऑपरेटर्ससाठी डीजीसीएने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. उ•ाण कर्मचाऱ्यांवर कोणताही दबाव टाकला जाऊ नये, तसेच सुरक्षेशी तडजोड होणार नाही, असे या नव्या नियमावलीमध्ये डीजीसीएने म्हटले आहे. व्हीआयपींना सामावून घेण्यासाठी शेवटच्या क्षणी होणारे बदल थेट कर्मचाऱ्यांकडे न करता केवळ ऑपरेटर व्यवस्थापनामार्फत केले जावेत, हवामानाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचेही निर्धारित केले आहे.
नवीन मार्गदर्शक तत्त्वांमुळे व्हीआयपींच्या प्रवासामुळे वैमानिकांना थकवा येणार नाही याची खात्री केली जाईल. याचदरम्यान जर एखाद्या नेत्याने दबाव टाकला, तर वैमानिक थेट नकार देऊ शकतो आणि त्याची जबाबदारी व्यवस्थापनाची असेल, वैयक्तिक वैमानिकाची नाही. 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळावर झालेल्या विमान अपघातानंतर डीजीसीएने व्हीआयपींच्या प्रवासासंबंधीच्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे.
डीजीसीएचे नवीन नियम
- वैमानिक आणि कर्मचाऱ्यांवर कोणताही दबाव टाकला जाणार नाही.
- विमान उडवणाऱ्या वैमानिकाला किमान 3,000 तासांचा अनुभव असावा.
- हेलिकॉप्टर वैमानिकाकडे किमान 2,000 तासांचा अनुभव असणे आवश्यक.
- व्हीआयपींनी शेवटच्या क्षणी केलेले बदल थेट वैमानिकाकडे न करता कंपनी व्यवस्थापनाकडे करावेत.
- प्रत्येक ऑपरेटरने एका जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती करणे आवश्यक आहे. ती व्यक्ती सर्व नियमांचे पालन करण्यासाठी जबाबदार असेल.