मणिपूर, ओडिशामध्ये नवे राज्यपाल नियुक्त
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मणिपूर आणि ओडिशा या दोन राज्यांमध्ये नव्या राज्यपालांची नियुक्त करण्यात आली आहे. मणिपूरच्या राज्यपालपदी माजी केंद्रीय गृहसचिव अजयकुमार भल्ला यांना, तर ओडिशा राज्याच्या राज्यपालपदी हरीबाबू कंभामपती यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली आहे. भल्ला यांना मणिपूर उच्च न्यायालयानचे मुख्य न्यायाधीश डी. कृष्णकुमार यांनी राजभवनात शुक्रवारी पदाची शपथ दिली. भल्ला हे आतापर्यंतच्या इतिहासात केंद्रीय गृहसचिवपदी सर्वाधिक काळ राहिलेले राजपत्रित अधिकारी आहेत. यांच्या शपथविधी कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री ए. बीरेन सिंग आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
हरीबाबू कंभामपती यांना ओडीशा उच्च न्यायालयाचे चक्रधारी शरण सिंग यांनी या राज्याची राजधानी असलेल्या भुवनेश्वर येथील राजभवनात पदाची शपथ दिली. या कार्यक्रमाला ओडीशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी, राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते नवीन पटनाईक, ओडीशाचे विविध मंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कंभामपती हे रघुवर दास यांचे स्थान घेत आहेत. दास यांनी नुकताच या राज्याच्या राज्यपालपदाचा त्याग केला आहे. कंभामपती हे यापूर्वी मिझोराम राज्याचे राज्यपाल होते. त्यांची नियुक्ती आता ओडिशात झाली आहे.