For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पश्चिम बंगालमध्ये शनिवारी नवे सरकार

06:48 AM May 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
पश्चिम बंगालमध्ये शनिवारी नवे सरकार
Advertisement

शपथविधीच्या सज्जतेला प्रारंभ, निरीक्षकपदी अमित शाह : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदासाठी शूभेंदू अधिकारी यांचे नाव आघाडीवर

Advertisement

वृत्तसंस्था / कोलकाता

विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजय प्राप्त केल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापनेच्या सज्जतेला प्रारंभ केला आहे. येत्या शनिवारी, अर्थात 9 मे या दिवशी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे, अशी घोषणा या पक्षाच्या राज्य शाखेचे अध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी मंगळवारी केली. तथापि, अद्याप भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केलेली नाही. त्यांचे नाव विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत निश्चित होण्याची शक्यता आहे.

Advertisement

पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाच्या घवघवीत यशासाठी महत्त्वाचे योगदान दिलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नियुक्ती पक्षनेता आणि सरकार स्थापनेच्या प्रक्रियेचे निरीक्षक म्हणून करण्यात आली आहे. अमित शाह लवकरच कोलकाता येथे पोहचणार आहेत. येत्या शनिवारी जगप्रसिद्ध बंगाली कवी आणि नोबेल पारितोषिक विजेते दिवंगत रविंद्रनाथ टागोर यांची जयंती आहे. या दिवसाचे औचित्य साधून त्याच दिवशी नवे सरकार स्थापन करण्याची पक्षाची योजना आहे.

प्रचंड विजय

विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगालमध्ये 294 जागांपैकी 206 जागा जिंकत मोठा विजय मिळविला. सोमवारी मतगणना पार पडली. त्यामुळे आता नव्या सरकारच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. आता उत्सुकता मुख्यमंत्र्यांच्या नावाची आहे. यासंबंधी लवकरच निर्णय अपेक्षित आहे.

1977 पासून प्रथमच...

1977 पासून प्रथमच यावेळी केंद्रात आणि पश्चिम बंगालमध्ये एकाच पक्षाचा नेता असण्याचा योगायोग घडणार आहे. गेली 49 वर्षे केंद्रात आणि पश्चिम बंगालमध्ये भिन्न पक्षांचे नेते राहिलेले आहेत. हा ही एक या निवडणुकीने घडविलेला विक्रमच आहे, असे मानण्यात येत आहे. या राज्याच्या इतिहासात प्रथमच येथे भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थानापन्न होत आहे. त्यामुळे राज्याच्या प्रशासनात आणि प्रशासन पद्धतीतही मोठे परिवर्तन होईल, अशी शक्यता आहे.

मुख्यमंत्री कोण होणार...

निवडणुकीचे परिणाम समोर आल्यानंतर आता नवा मुख्यमंत्री कोण याची चर्चा रंगू लागली आहे. अनेक नेत्यांची नावे सध्या चर्चेत आहेत. या नेत्यांच्या सूचीत शुभेंदू अधिकारी यांच्यापासून दिलीप घोष यांच्यापर्यंत अनेक नावांचा समावेश आहे. मात्र, शुभेंदू अधिकारी हे आघाडीवर असल्याचे स्पष्ट होत आहे. मावळत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा त्यांनी दोनदा पराभव केला आहे. त्यामुळे त्यांचीच नियुक्ती नवे मुख्यमंत्री म्हणून होईल, असे मानले जाते. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचा उदय आणि विकास होण्याच्या प्रक्रियेत सर्वाधिक योगदान असणारे नेते म्हणून दिलीप घोष परिचित आहेत. त्यांचेही नाव चर्चेत आहे. येत्या एक-दोन दिवसांमध्ये यासंबंधीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर पुढच्या हालचाली होतील.  पक्षाच्या राज्यशाखेचे अध्यक्ष समिक भट्टाचार्य आणि अग्निमित्रा पॉल यांचीही नावे चर्चेत असली, तर नेतृत्वाच्या मुद्द्यावर कोणतेही मतभेद नाहीत, हे स्पष्ट आहे.

चर्चांच्या सत्राला प्रारंभ

सोमवारी निवडणुकीचे परिणाम समोर आल्यानंतर त्वरित पक्षांतर्गत चर्चांच्या फेऱ्या घडविण्यात येत आहेत. पक्षाचे सर्व 205 नवनिर्वाचित आमदार राजधानी कोलकाता येथे आलेले असून त्यांची अधिकृत बैठक बुधवारी होण्याची शक्यता आहे. या बैठकीतच नवा विधिमंडळ पक्षनेता निवडण्यात येणार असून अमित शाह यांच्या निरीक्षणात ही बैठक होईल. त्यानंतर शपथविधीच्या सज्जतेला खरा रंग येईल. संभाव्य मंत्र्यांची नावे देखील याच बैठकीत निर्धारीत करण्यात येतील, अशी शक्यता भारतीय जनता पक्षाच्या सूत्रांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे.

नव्या नेत्याचे नाव त्वरित ठरणार

ड अमित शाह कोलकाता येथे पोहचल्यानंतर नवनिर्वाचितांची बैठक होणे शक्य

ड भारतीय जनता पक्षाचा विधानसभा निवडणुकीत 206 जागांसह मोठा विजय

ड राज्यात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, नेते अद्यापही विजयोत्सवात मग्न

Advertisement
Tags :

.