Kolhapur : कोल्हापूरमध्ये विद्यार्थ्यांसाठी नवीन शासकीय वसतिगृह ; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
कसबा बावडा, दसरा चाक, पाचगावात विद्यार्थी वसतिगृह
कोल्हापूर : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी चार शासकीय वसतिगृह उभारण्याच्या प्रस्तावास राज्य शासनाची मंजुरी मिळाली आहे. यासाठी ६६ कोटी ७६ लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यताही मिळाली असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. मान्यतेमुळे कसबा बावडा येथे दोन, दसरा चौक आणि पाचगांव येथे प्रत्येकी एक अशी चार वसतिगृह उभारण्याच्या प्रकल्पाला गती मिळणार आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शासकीय वसतिगृहांच्या इमारत बांधकामासाठी राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या उच्चस्तरीय सचिव समितीच्या बैठकीत वसतिगृहांची सद्यस्थिती, आवश्यक दुरुस्ती, बांधकाम नकाशे आणि अंदाजपत्रकाचे परीक्षण करण्यात आले. त्यानंतर बांधकाम नकाशांना त्वरित मंजुरी देऊन, आवश्यक तांत्रिक प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहेत.
अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या कल्याणकारी योजनांमधून, राज्य योजनांमधून उपलब्ध निधीचा उपयोग करून या कामांना प्राधान्याने गती देण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. आयुक्त, समाज कल्याण पुणे जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांना या कामांचा नियमित आढावा घेण्याची, आवश्यक तेथे समन्वय साधण्याची आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळेल अशा पद्धतीने कामे वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
शहरात उच्च शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ व आधुनिक सुविधांनी युक्त वसतिगृहांची मोठी गरज होती. त्यानुसार शहरात चार शासकीय वसतिगृहे आधुनिक पद्धतीने उभारली जाणार असून आवश्यक दुरुस्त्या, नव्या खोल्या, भोजनालय, सौरऊर्जा प्रणाली, वाचनालय, सुरक्षा व्यवस्था आणि पाणीपुरवठा सुधारणा यांसारख्या सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित निवासव्यवस्था निर्माण करण्याबरोबरच दर्जेदार सुविधा उपलब्ध करण्यावर भर देण्यात येणार आहे. मागासगर्गीय, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी बसतिगृह शहरात उभारण्या येणाऱ्या चार वसतिगृहांपैकी तीन वसतिगृह मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी तर एक वसतिगृह गुणवंत विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात येणार आहे.
अशी असणार चार वसतिगृह
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह पाचगाव.
▶ मागसवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, कसबा बावडा.
▶ गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह, दसरा चौक
▶ मुलींचे वसतिगृह, कसबा बावडा.
विद्यार्थ्यांसाठी उत्तम सुविधा असलेले वसतिगृह उपलब्ध करून देणे ही प्राथमिकता आहे. पुढील काळातही शैक्षणिक पायाभूत सुविधांसाठी अशाच प्रकारचे चांगले निर्णय घेण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील. शासनाच्या या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना सुरक्षित, सुसज्ज आणि सुधारित शासकीय वसतिगृहांची सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
- प्रकाश आबिटकर, पालकमंत्री कोल्हापूर.